राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार-२०२२’चे वितरण

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार-२०२२’चे वितरण

आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानातून विद्यार्थ्यांना प्रेरणा : थावरचंद गेहलोत
 

पुणे : “शिक्षण संस्थांमधून ज्ञानाबरोबरच संस्कारही मिळावेत. ‘सूर्यदत्त’ सारख्या संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आहेत. समाजातील आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. समाजहितासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी आपण प्रत्येकाने योगदान द्यायला हवे,” असे प्रतिपादन कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. जीवनमूल्यांच्या अनुकरणातूनच भारताचे उज्ज्वल भविष्य घडेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या २४ व्या स्थापना दिवसानिमित्ताने ‘सुर्यदत्त’तर्फे ‘सुर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार-२०२२’चे वितरण गेहलोत यांच्या हस्ते झाले. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील सुर्यभवनमध्ये झालेल्या सोहळ्याला आचार्य डॉ. लोकेश मुनी, भजनसम्राट अनूप जलोटा, ‘सुर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, संचालक स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी उपस्थित होते.

‘सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव (प्रशासकीय सेवा), कर्नल (नि.) सुरेश पाटील (पर्यावरण संवर्धन), ‘जीतो’चे संस्थापक ललित गांधी (उद्योग, सामाजिक), सुरेश कोते (सहकार व सामाजिक), डॉ. राजेश गादिया (वैद्यकीय सामाजिक सेवा), बंधुताचार्य प्रकाश रोकडे (मानवता व बंधुतेचा प्रसार), मुकेश मोदी (उद्योग, सीएसआर) यांना प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ ‘बीव्हीजी’चे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड (कॉर्पोरेट एक्सलन्स), उद्योजक चंद्रकांत साळुंके (एसएमई प्रोत्साहन), रोटेरियन डॉ. सिमरन जेठवानी (महिला सक्षमीकरण, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन (सामाजिक कार्य), सौरभ बोरा (आर्थिक व आध्यात्मिक सेवा), सॉलिसिस लेक्सचे व्यवस्थापकीय भागीदार ऍड. अमित मेहता (कायदा व न्यायव्यवस्था) आणि ग्लोबल डिजिटल मीडिया तज्ज्ञ भाव्या श्रीवास्तव यांना प्रदान करण्यात आला.

थावरचंद गेहलोत म्हणाले, “शिक्षणाला उद्योजकता, सामाजिकतेची जोड द्यावी. डिजिटल लर्निंग, इनोव्हेशन, स्टार्टअप, मेक इन इंडिया यासारखे उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. नवीन शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर, नीतीमूल्यांवर भर दिला असून, मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी दिली जात आहे. आधुनिक, मूल्याधिष्ठित आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्याचे कार्य सूर्यदत्त संस्था करीत आहे. याच पद्धतीचे शिक्षण सर्व संस्थांनी दिले, तर भारत विश्वगुरू बनण्यास वेळ लागणार नाही.”

 
आचार्य लोकेश मुनी म्हणाले, “समाजाच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान प्रेरक आहे. भारताच्या भूमीत इतके सुंदर कार्य होतेय, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. समाज उत्थानाचे हे कार्य असेच अविरतपणे चालत राहावे.” प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार व्हावेत, त्यांची सर्वांगीण जडणघडण व्हावी, याकरिता त्यांना विविध क्षेत्रातील लोकांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख महत्वाची आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ रत्नांना सन्मानित करताना आनंद होतो आहे.”
 
विठ्ठल जाधव म्हणाले, “आपल्या ध्येयावर आपण लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सूर्यदत्त संस्था दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेत अधिकाधिक चांगले शिक्षण आणि संस्कार घेऊन राष्ट्राला, समाजाला अभिमानास्पद कामगिरी करावी.” कर्नल (नि.) सुरेश पाटील म्हणाले, “पर्यावरणाचा समतोल राखणे ही आजच्या काळाची गरज आहे. जलसंधारण, पर्यावरण संवर्धन या कामात आपले योगदान गरजेचे आहे. ज्यांच्याकडे पाणी असेल तेच भविष्यात शक्तिशाली राष्ट्रे असतील.” सुरेश कोते म्हणाले, “समाजातील लोकांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना सन्मानित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाच्या, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण काम करावे.”
 
चंद्रकांत साळुंके म्हणाले, “उत्पादन, निर्यात या क्षेत्रात भारत चांगली कामगिरी करत आहे. अलीकडच्या काळात अनेक स्टार्टअप विकसित होत आहेत. तरुणांनी उद्योगाभिमुख शिक्षण व्यावसायिक विकासावर भर दिला पाहिजे.” अनुप जलोटा, डॉ. राजेश गादिया, डॉ. सिमरन जेठवानी, ऍड. अमित मेहता यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *