डॉ. भागवत कराड यांचे विश्लेषण; ‘आयसीएआय’तर्फे ‘विकासाभिमुख अर्थसंकल्प’वर परिसंवाद
पुणे : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राष्ट्रहित, शाश्वत विकास आणि स्थैर्य केंद्रित आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी होत असताना मांडलेला हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षांचा विचार करून गतिमान विकासावर भर देणारा आहे,” अशा शब्दांत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने ‘विकासाभिमुख अर्थसंकल्प’ या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. कराड बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील ‘एमसीसीआयए’मध्ये झालेल्या परिसंवादात ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए काशीनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, सचिव प्रितेश मुनोत, सीए अजिंक्य रणदिवे, सीए ऋषीकेश बडवे, सीए सचिन मिनियार, भाजपचे शहर संघटक राजेश पांडे आदी उपस्थित होते.
डॉ. भागवत कराड म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प मांडला गेला. त्यामुळे याबद्दल उत्सुकता आणि अपेक्षाही होत्या. परंतु, सर्वसमावेशक विचार करत देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न यातून झाला. ३९ लाख ४५ हजार कोटींच्या या अर्थसंकल्पात सामाजिक समतोल साधत अनेक चांगल्या तरतुदी करण्यात आल्या. गेल्या सात वर्षांत दुपटीने अर्थसंकल्पाच्या तरतुदीत वाढ झाली आहे. रोजगार निर्मिती, शेती, संरक्षण, आरोग्य, शिक्षण यासह इतर क्षेत्रांवर भर देत भारताला शाश्वत व सक्षम विकासाच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे.”
“आत्मनिर्भर भारतासाठी व्होकल ‘फॉर लोकल’वर भर दिला जात आहे. पारदर्शी गव्हर्नन्स, डिजिटल व्यवहार यामुळे भ्रष्टाचाराला चाप लागत आहे. सरकारी खर्च कमी केला जात आहे. विदेशी गुंतवणूक वाढत असून, जीएसटी संकलन समाधानकारक आहे. त्यामुळे विकासकामांवर खर्चाची तरतूद शक्य होत आहे. पायाभूत सुविधांसह संरक्षण क्षेत्रावर भरीव तरतुदी केल्या आहेत. अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणात सनदी लेखापालांनी योगदान द्यावे. कारण सनदी लेखापाल हे आर्थिक डॉक्टर असतात, असे मला वाटते,” असेही डॉ. भागवत कराड म्हणाले.
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सनदी लेखापाल हे सरकार आणि करदाते यांच्यातील दुवा आहेत. करदात्यांच्या हितासाठी करप्रणाली अधिकाधिक सुलभ करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. यंदाचा अर्थसंकल्प विकासाकडे वाटचाल करणारा आहे.” स्वागत प्रास्ताविक सीए काशिनाथ पठारे यांनी केले. सूत्रसंचालन सीए सचिन मिनियार यांनी केले. आभार सीए राजेश अग्रवाल यांनी मानले.