‘पिफ २०२२’ मध्ये कासारवल्ली यांच्या चित्रपटांवरील पुस्तकाचे प्रकाशन

‘पिफ २०२२’ मध्ये कासारवल्ली यांच्या चित्रपटांवरील पुस्तकाचे प्रकाशन

अधिकाधिक दिग्दर्शकांवर पुस्तकांची गरज – गिरीश कासारवल्ली

पुणे : अधिकाधिक चित्रपट दिग्दर्शकांवर पुस्तके येण्याची गरज आहे. त्यातून त्यांचा दृष्टिकोन तर समजतोच, पण पुढच्या पिढीलाही त्याचा फायदा होतो, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली (Girish Kasarwalli) यांनी व्यक्त केले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Pune International Film Festival) (पिफ २०२२ PIFF 2022), ‘सिअर ऑफ कंटेम्पररी हिस्टरी – गिरीश कासारवल्ली अँड हिज सिनेमा’ या गणेश मतकरी (Ganesh Matkari)यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी गिरीश कासारवल्ली बोलत होते. ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल, (Jabbar Patel) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (NFAI) संचालक प्रकाश मगदूम, ‘ पिफ’च्या संयोजन समितीचे सदस्य समर नखाते, लेखक गणेश मतकरी यावेळी उपस्थित होते.
 
कासारवल्ली म्हणाले, “चित्रपट दिग्दर्शक आणि त्यांच्या चित्रपटांमधून मांडलेल्या राजकीय- सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण करणारी अधिकाधिक पुस्तके येण्याची गरज आहे. त्यातून समकालीन चित्रपटांचा इतिहास समजत जातो.” कासारवल्ली पुढे म्हणाले, “हे पुस्तक पुण्यामध्ये प्रसिद्ध होणे हा एक भावनिक क्षण आहे कारण मी इथेच ५० वर्षांपूर्वी चित्रपट शिकायला आलो होतो.” आपल्या चित्रपटांवर इंग्रजीमध्ये आलेले हे ९ पुस्तक असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
मगदूम म्हणाले, “राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे संशोधन पठ्यवृत्ती दिली जाते. त्यातूनअनेक चित्रपट दिग्दर्शक आणि संबंधित लोकांवर संशोधन केले जाते. त्यातून पुस्तकनिर्मिती केली जाते. या प्रकल्पातून आत्तपर्यंत २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.” मतकरी यांनी उत्तम संशोधन करून हे पुस्तक पुढे आणल्याचे त्यांनीं सांगितले.
 
पटेल म्हणाले, “कासावल्ली हे एकमेव दिग्दर्शक आहेत, ज्यांना १४ राष्ट्रीय पुरस्कार आणि ४ सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे चित्रपट हे काळाच्या पुढे आहेत. “ २०२३ मध्ये कासावल्ली यांच्या चित्रपटांवर रेट्रस्पेक्टीव्ह करणार असल्याचे त्यांनी सांगितले. समर नखाते म्हणाले, “कासारवल्ली यांचे चित्रपट माणसाचा प्रवास सांगणारे आहेत. त्यांच्या चित्रपटांवर आलेले हे पुस्तक समकालीन इतिहास सांगणारे आणि म्हणूनच पुढे कसे पहायचे याचे भान देणारे आहे.”
 
मतकरी म्हणाले, “आपण सगळा सिनेमा हा एकच प्रतलावर आणि एकाच पद्धतीने पाहत असतो. मला कासारवल्ली यांचा सिनेमा वैशिष्ट्यपूर्ण वाटला. त्यांचा सिनेमा इतिहास घडत असताना त्याकडे वेगळ्या प्रकारे पाहतो. जणूकाही पुढे घडणाऱ्या गोष्टी त्या चित्रपटांमधून दिसतात. एकाचवेळी समाज आणि व्यक्ती यांच्याकडे कासारवल्ली यांचा सिनेमा पाहतो. आणि त्यांच्या संबंधांवर भाष्य करतो. व्यवस्थेकडे सामान्य माणूस कसा बघतो, हे त्यांच्या सिनेमातून दिसते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *