पुणे : “रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी घट आणि लसीकरण मोहिमेला आलेला वेग यामुळे उद्योगासह सर्वच क्षेत्रांना मोकळीक मिळाली आहे. आगामी काळात कोणत्याही प्रकारची लाट आली नाही, तर येत्या वर्षभरात उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येईल,” असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष सुधीर मेहता यांनी व्यक्त केले.
सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सुधीर मेहता यांना गेल्या वर्षभरात कोविड काळात उद्योग व सामाजिक क्षेत्रातील महत्वपूर्ण भरीव कार्याबद्दल ‘सुर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ ‘सुर्यदत्ता’चे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर मेहता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने, उद्योजक सुभाष कांकरिया, सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. रोहित संचेती आदी उपस्थित होते.
सुधीर मेहता म्हणाले, “कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. हॉटेल, पर्यटन आणि सेवा क्षेत्रातील उद्योगांना सर्वाधिक झळ बसली. कृषी व उत्पादन क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे, तर इतर उद्योगही सावरत आहेत. ‘एमसीसीआयए’कडून सातत्याने सर्वेक्षण करण्यात येत असून, गरजेप्रमाणे उद्योगांना सूचना देण्यात येत आहेत. उद्योगांना पुन्हा उभा राहण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन केले जात आहे.”
“कोरोना काळात आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी ‘एमसीसीआयए’ने अनेक उपक्रम हाती घेतले. ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, पीपीई किट्स, अन्नधान्य वाटप व अन्य उपक्रम राबविण्यात आले. उद्योगांतील कामगारांचे लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे,” असेही सुधीर मेहता यांनी नमूद केले.
सुधीर मेहता पुढे म्हणाले, “शिक्षण आणि उद्योग यांना जोडण्याचा सुर्यदत्ताचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. दर्जेदार, कौशल्यभिमुख शिक्षण देऊन सुर्यदत्ता उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ निर्मिती करत आहे. शिक्षण क्षेत्रही लवकरच सुरळीत होऊन विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये येऊन शिक्षण घेता येईल.” अफगाणिस्तानमधील तणावाचा भारतीय उद्योगावरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कोरोनाच्या कठीण काळात ‘एमसीसीआयए’च्या माध्यमातून उद्योगांना, समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्याचे महत्वपूर्ण कार्य मेहता यांनी केले. त्यांच्या या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करताना आनंद होतो आहे.”