माधुरी सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन; ‘वंचित विकास’तर्फे नितीन करंदीकर यांना ‘सुकृत पुरस्कार’ प्रदान
पुणे : “समाजातील अनेक वंचित, मागास घटकातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांमध्ये समाजसेवेची बीजे रुजवायला हवीत,” असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले. नितीन करंदीकर दुचाकी रुग्णवाहिकेसह गडचिरोली भागात केलेले कार्य मोलाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जाणीव व वंचित विकास संस्थेतर्फे शुभदा-सारस्वत प्रकाशन पुरस्कृत ‘सुकृत पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते नितीन करंदीकर यांना प्रदान करण्यात आला. हिंसा व गुन्हेगारी विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात झालेल्या या सोहळ्यात वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्यवाह आणि संचालक मीना कुर्लेकर, संचालक सुनीता जोगळेकर, प्रकाशनाचे शरद गोगटे आदी उपस्थित होते.
दत्तवाडी भागातील फिरस्ती व व्यसनाधीन मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देत स्वावलंबी बनवले. घरकाम करणाऱ्या महिलांनाही त्यात गुंतवले. आदमबाग, सुभाषनगर येथील मुलींचे पालकत्व स्वीकारले. कोरोनाच्या काळात रोटरी क्लब, पुणे पोलीस, वंचित विकास व अन्य संस्थांसोबत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. गरजू लोकांना कॉम्प्युटर, मोबाईलही दिले. गडचिरोली, पुण्यासह ठाणे, पालघर येथील वंचित घटकांनाही त्यांनी भरीव मदत केली. हे सगळे कार्य लक्षात घेऊन वंचित विकास संस्थेने नितीन करंदीकर यांना सुकृत पुरस्काराने सन्मानित केले, असे मीना कुर्लेकर यांनी नमुद केले.
माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, “गडचिरोली भागातील लोकांची मानसिकता आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून दुचाकी रुग्णवाहिका तयार करणे हे कौतुकास्पद आहे. यातून त्यांची जिद्द, चिकाटी आणि मदत करण्याचे साहस दिसून येते. दुसऱ्याचे दुःख आणि वेदना लक्षात घेऊन त्यावर काम करणे महत्वाचे आहे.”
नितीन करंदीकर म्हणाले, “समाज कार्याचे बाळकडू घरातच मिळाल्याने आपण वेगळे करतोय असे वाटले नाही. बालकामगार, व्यसनाधीन मुले, महिलांवर होणारे घरगुती अत्याचार ही परिस्थिती बघून मन विषन्न होत असे. समस्येवर उपायाभिमुख काम करत गेलो. वंचित विकाससारख्या संस्था पाठीशी असल्यास सामान्य कार्यकर्ताही असामान्य कार्य करतो.”
देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले. मीना कुर्लेकर यांनी आभार मानले.
दुचाकी रुग्णवाहिका उपयुक्त
गडचिरोली भागामध्ये रुग्णाला दवाखान्यात नेताना आदिवासी लोकांना खूप प्रवास करावा लागतो. रुग्ण अत्यवस्थ असला तर प्रवासातच त्याचा मृत्यू होतो. त्या लोकांचा विचार करून माझ्या अभियांत्रिकी कौशल्याचा उपयोग करून त्यांच्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका तयार केली. आता तिथे तीन दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहे. या कामात माझ्या पत्नीचीही मोलाची साथ आहे.
– नितीन करंदीकर, सामाजिक कार्यकर्ते