त्वचारोग टाळण्यासाठी नैसर्गिक प्रसाधने वापरावीत

त्वचारोग टाळण्यासाठी नैसर्गिक प्रसाधने वापरावीत

पुणे : “त्वचा शरीरातील सर्वात महत्वाचा; पण दुर्लक्षित अवयव आहे. याबाबत अलीकडच्या काळात जागरूकता वाढली असली, तरी रासायनिक प्रसाधनांच्या वापरामुळे त्वचारोगांना निमंत्रण मिळत आहे. आपली त्वचा सुरक्षित, तुकतुकीत आणि ताजीतवानी ठेवून त्वचारोग टाळण्यासाठी नैसर्गिक प्रसाधनांचा वापर केला पाहिजे,” असे प्रतिपादन सिनियर कन्सल्टन्ट फिजिशियन, इंटेन्सीव्हीस्ट डॉ. गिरीश दाते यांनी केले.

वैद्य हरीश पाटणकर संकल्पित बहुशाखीय उपचारपद्धती असलेल्या ‘कायायुर्वेद’चे लोकार्पण व सत्कार समारंभावेळी डॉ. दाते बोलत होते. पत्रकार भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश डुंबरे, वैद्य सुकुमार सरदेशमुख, डॉ. भाग्येश कुलकर्णी, तर्पण आय क्लिनिकच्या वैद्य स्नेहल पाटणकर आदी उपस्थित होते. कोरोना काळात केलेल्या रुग्णसेवेबद्दल डॉ. गायत्री संत, डॉ. रोशन चव्हाण, शेखर बर्गे, अक्षय बर्गे, श्रद्धा काटकर, विराज शेख, अदिती प्रधान, अरुण कोळसे यांना कोरोनायोद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ‘कायायुर्वेद’च्या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले.

डॉ. सतीश डुंबरे म्हणाले, “वेगवेगळी स्वप्ने बघितली की विकास घडत जातो. त्वचा रोगाचे रुग्ण वाढत आहेत. कोणताही रोग मुळापासून दूर करणे महत्वाचे असते. वैद्याने आयुर्वेद स्वतःपुरता न ठेवता इतर पॅथींचाही उपयोग करणे गरजेचे आहे. ‘कायायुर्वेद’ची संकल्पना राबवणे कठीण आहे. ही जोखीम पाटणकरांनी उचलली आहे. त्यांच्या हातून चांगले काम घडेल.”

वैद्य सुकुमार सरदेशमुख म्हणाले, “पाटणकरांची आयुर्वेदासोबतची निष्ठा मोलाची आहे. काळाची गरज ओळखून रुग्णाला सुलभ पद्धतीने उपचार व औषध देण्याचे काम ते करत आहेत. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून केलेल्या उपचार पद्धतीमुळे रुग्णांना मदत होते. आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात पाटणकर करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे.”

डॉ. भाग्येश कुलकर्णी म्हणाले, “दहा वर्षांपासून ज्या संकल्पनेवर काम करतोय, तेच काम कायायुर्वेदमध्ये दिसत आहे. सर्व पॅथींचा उपयोग करून रुग्णांवर उपचार केल्यास आजार मुळापासून बरा होऊ शकतो. स्वप्नांना परिश्रमाची जोड दिली, तर स्वप्ने साकार होतात. त्वचा शरीराचा आरसा असते. बाह्य उपचारापेक्षा आंतरिक व्याधीवर काम केल्यास त्वचारोग लवकर बरा होऊ शकतो.”

वैद्य हरीश पाटणकर यांनी प्रास्ताविकात ‘कायायुर्वेद’ची सखोल माहिती दिली. विविध पॅथींतील उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत रुग्णाला त्वचारोगापासून मुक्त होण्याचा विश्वास देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ सिद्धी गुंफेकर, डॉ. प्रियंका डावर यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य स्नेहल पाटणकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *