उमेश चव्हाण म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुःखात जगणाऱ्या करोडो लोकांचे आयुष्य सुखी केले. सर्वांना समतेचा अधिकार दिला. भारतीय घटनेची निर्मिती करून देशातील लोकशाही मजबुत केली. स्त्रियांना, पद-दलितांना, पीडितांना न्याय मिळवून दिला. सर्वांना मानवी हक्क बहाल केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वतेने संपूर्ण जगाला चकित केले होते. भारतातील प्रत्येक माणसावर त्यांचे अनंत कोटी उपकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी आंबेडकरी विचारांचा जागर दरवर्षी केला जातो.”
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘जातीअंत’ या समृद्ध संकल्पनेचा अर्थच प्रत्येक माणूस समान आहे. येथील जातीधर्मातील विषमता नष्ट होऊन समता प्रस्थापित झाली पाहिजे. यासाठी रक्तदान हे खूप महत्वाचे आहे. मानवी रक्ताला जात नसून, रक्तगटाच्या नावाने संबोधले जाते. सर्व जातीधर्मीयांचा जीव वाचविणारे महान रक्तदान करून महामानवाला अभिवादन करण्यासाठी ससून रक्तपेढी, केईएम रक्तपेढी, ओम ब्लड बँक, पूना ब्लड बँक यांच्या माध्यमातून रक्त संकलित केले जाईल. महापरिनिर्वाणदिनी रक्तदान शिबिराचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत रक्तदान शिबीर सुरु राहिल. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त स्मार्तना पाटील, आर. राजा, संदीपसिंग गिल्ल, निखिल पिंगळे, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित राहणार आहेत.”
यासह विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या वतीने आंबेडकरी विचारांची व्याख्याने, शाहिरी जलसा, आंबेडकरी गीतांचे सादरीकरण, कवी संमेलन, चर्चासत्र, परिसंवाद, भीमगीत गायन, अभिवादन सभा होणार आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसिद्ध गायक राहुल शिंदे आणि कलाविकास संघाचे सहकारी आदरांजलीपर वैचारिक गीते सादर करतील. रात्रौ १२ वाजता अभिवादन प्रार्थना, बुद्ध वंदना होईल. यावेळी १० हजार मेणबत्ती पेटवून अभिवादन करण्यात येईल. सकाळी १० वाजता सर्वपक्षीय अभिवादन सभा, व्याख्याने, कवी संमेलन आणि परिसंवाद होईल. यामध्ये प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, आचार्य रतनलाल सोनाग्रा, माजी आमदार जयदेव गायकवाड, अविनाश साळवे, दीपक म्हस्के, डॉ. अमोल देवळेकर, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, परशुराम वाडेकर, शैलेंद्र चव्हाण, वसंतराव साळवे, अंकल सोनवणे, गझल गायक अशोक गायकवाड, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, ऍड. किरण कदम, डॉ. संजय दाभाडे, कवयित्री रूपाली अवचरे यांच्यासह विविध मान्यवर मौलिक विचार मांडतील. सलग ११ व्या वर्षी महापरिनिर्वाण दिनी ‘आंबेडकरी विचारांचा जागर’ हा कार्यक्रम आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायांच्या सहभागाने आयोजित केल्याची माहिती उमेश चव्हाण यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी रुग्ण हक्क परिषदेतर्फे सलग २४ तास आंबेडकरी विचारांचा जागर
पुणे: भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांतून सलग २४ तास आंबेडकरी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. गेल्या ११ वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे रुग्ण हक्क परिषदेचे प्रमुख उमेश चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, अपर्णा साठे, दिलीप साळुंके, आशिष गांधी आदी उपस्थित होते.