पुणे: ७५वा भारतीय संविधान दिन नुकताच साजरा झाला. मात्र, ७५ वर्षांत संविधान सामान्य माणसापर्यंत पोहोचले का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. हे संविधान गावागावात, वाड्या-वस्तीवर पोहोचावे, समाजातील शेवटच्या घटकाला त्याचे महत्व, त्याला मिळालेले अधिकार व त्याची कर्तव्ये त्याला समजावीत यासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, फुले प्रेमी विजय वडवेराव संविधान जागृती करत आहेत.
भारतीय संविधान दिनानिमित्त मुळशी तालुक्यातील रिहे केंद्रांतर्गत येणाऱ्या गोडांबेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
विजय वडवेराव यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व सांगितले. शाळा
प्रमुख अर्चना मुत्याल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनतर वडवेराव यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गावात घरोघरी जाऊन संविधान उद्देशिकेचे वाटप केले. तसेच भारतीय संविधानाविषयी नागरिकांना माहिती देऊन त्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या याविषयी माहिती सांगत जनजागृती केली. गोडांबेवाडी कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व वीटभट्टया, बांधकाम क्षेत्रातील मजूर व कष्टकरी यांच्या झोपड्यात प्रत्यक्ष जाऊन संविधानाविषयी माहिती दिली. सर्व कुटुंबांना लाडूचा खाऊ देण्यात आला.
विजय वडवेराव म्हणाले, “जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षक, तसेच कवी म्हणून माझी ओळख आहे. भारतातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा संदर्भात गेल्या १२ वर्षांपासून जनजागृती व प्रबोधन, प्रचार प्रसाराची चळवळ चालवत आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या कार्याचे आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियान देशभर व देशाबाहेर चालवत आहे. तळागाळातील शेवटच्या कष्टकरी मजूर माणसापर्यंत संविधान पोहोचले पाहिजे.”