गरजू मुलांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा उभारल्याचे समाधान

गरजू मुलांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा उभारल्याचे समाधान

रुक्साना अंकलेसारिया यांचे मत; ‘लायन्स क्लब’तर्फे गोसावी महाविद्यालयात सोयीसुविधांचे उद्घाटन 

पुणे : “समाजातील गरीब व गरजू मुलांसाठी विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष यासह इतर अत्याधुनिक सोयीसुविधा उभारता आल्याचे समाधान आहे. निवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दिलेली देणगी सत्कारणी लागली,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या रुक्साना अंकलेसारिया यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंकलेसारिया कुटुंबाच्या अर्थसाहाय्यातून नामदेवराव मोहोळ महाविद्यालय अँड क्रीडा प्रतिष्ठान संचालित टीजी गोसावी महाविद्यालय, विठ्ठलवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या ‘नरिमन अर्देशीर’ दुमजली इमारतीचे, रतनलाल मर्चंट हॉल (संगणक कक्ष), नौरोजी प्रकाश हॉल (विज्ञान प्रयोगशाळा) अंकलेसारिया पाणपोई आदी सोयीसुविधांचे उद्घाटन करण्यात आले.

सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथील गोसावी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी मेहेर मानेकजी अंकलेसारिया, रुक्साना मेहेर अंकलेसारिया, खोर्देह मेहेर अंकलेसारिया, लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, ट्रस्टचे चेअरमन फतेचंद रांका, उपप्रांतपाल परमानंद शर्मा, सुनील चेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार अशोकराव मोहोळ, कार्याध्यक्ष सदानंद मोहोळ, मीरा मोहोळ, रोहिदास मोरे, बाळासाहेब गांजवे, उद्योजक तुषार गोसावी, संग्राम मोहोळ, डॉ. हिरेन निरगुडकर, सदाशिव लाळे, विद्यालयाचे प्राचार्य किरण सूर्यवंशी, लायन्स क्लबच्या अध्यक्ष दीपाली गांधी, आशा ओसवाल, पूनम अष्टेकर, अंजली ओसवाल, माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी आदी उपस्थित होते.

अशोकराव मोहोळ म्हणाले, “ग्रामीण भागातील, गरीब व गरजू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यावर, तसेच रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. अंकलेसरिया कुटुंबिय आणि लायन्स क्लबच्या मदतीने हे मोठे काम उभे राहिले. अशा दानशुरांच्या मदतीने मुलांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गरीब व गरजू मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊ शकतो, याचे समाधान वाटते.”

फतेचंद रांका म्हणाले, “गरजू विद्यार्थ्यांसाठी या सोयीसुविधा उपलब्ध केल्याचे आनंद आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम होणार आहे. चांगले संस्कार व शिक्षण यासोबतच अत्याधुनिक सोयीसुविधा गरजेच्या आहेत.”

हेमंत नाईक म्हणाले, “लायन्स क्लबने जपलेली सामाजिक बांधिलकी समाजाला उपयुक्त अशी आहे. हाच सामाजिक कार्याचा वारसा यापुढेही चालू राहील. इच्छाशक्ती आणि मूल्यांची सांगड घालून उभारलेले काम चांगले होते.”

सुनील चेकर, परमानंद शर्मा यांनीही मनोगते व्यक्त केली. स्वागत-प्रास्ताविक दीपाली गांधी, किरण सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन विलास बनसुडे यांनी केले. आभार बाळासाहेब गांजवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *