‘रॉयल चॅलेंजर्स’ने पटकविले आसवानी क्रिकेट कपचे विजेतेपद

‘रॉयल चॅलेंजर्स’ने पटकविले आसवानी क्रिकेट कपचे विजेतेपद

पुणे : आसवानी क्रिकेट कप (एसीसी) २०२३ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स वरुण संघाने पटकाविले. पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने मंगतानी टायटन्सवर ८ गड्यांनी विजय मिळवत ‘एसीसी’च्या सोनेरी करंडकावर आपले नाव कोरले. महिलांच्या डॉजबॉल स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स वरुण संघाने रत्नानी नाईट रायडर्स संघावर विजय मिळवत स्पर्धेचा दुहेरी मुकुट जिंकला. ‘ये है पिंपरी का त्योहार’ चा नादघोष करत सिंधी बांधवानी स्पर्धेचा आनंद लुटला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मंगतानी टायटन्सची सुरुवात संथ व अडखळत झाली. निर्धारित १२ षटकांत ५ गडी गमावत टायटन्सला ६५ धावा उभारता आल्या. मयूर ललवाणी व पियुष रमनानी यांनी प्रत्येकी १७ धावांचे योगदान दिले. मनीष कटारियाने २४ धावांत २, तर जयेश केलानीने १५ धावांत २ गडी बाद केले. विजयासाठी ६६ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्सने अवघ्या ८.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष पार केले. सलामीवीर महेश तेजवानी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत नाबाद ३७ धावांची खेळी केली. त्याला जितेश तिलोकचंदानी याने १० उत्तम साथ दिली. तेजवानीला सामनाविराचा किताब देण्यात आला. मयूर ललवाणी व पवन पंजाबी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 

विजेत्या रॉयल चॅलेंजर्स संघाला भव्य सुवर्ण करंडक आणि ५,५५,५५५/-, तर उपविजेत्या टायटन्स संघाला रजत करंडक आणि ३,३३,३३३/- रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. मयूर ललवाणी (मॅन ऑफ द सिरीज) आणि कीर्ती (डॉजबॉल-वुमेन ऑफ द सिरीज) यांना चेतक स्मार्ट इलेक्ट्रिक स्कुटरचे पारितोषिक मिळाले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून दक्ष खेमनानी, सर्वोत्तम फलंदाज म्हणून सागर मथानी यांनी मान मिळवला.

स्पर्धेचे प्रमुख संयोजक आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी म्हणाले, “जवळपास महिनाभर क्रिकेट व डॉजबॉल स्पर्धेचा आनंद घेतला. यंदा सिंधी समाजातील महिला आणि मुलींनाही खेळासाठी प्रोत्साहित केले. अतिशय उत्साहात आणि आनंदात ही स्पर्धा पार पडली. सिंधी समाजात खेळाचे महत्व वाढत असून, कुटुंबीय देखील या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. खऱ्या अर्थाने ‘पिंपरी का त्योहार’ या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अनुभवला.”

 

————-

संक्षिप्त धावफलक

मंगतानी टायटन्स (१२ षटकांत) ५ बाद ६५ (मयूर ललवाणी १७, पियुष रमनानी १७, सुमित कटारिया १६, जयेश केलानी २-१५, मनीष कटारिया २-२४) पराभूत विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स वरुण  (८.५ षटकांत) २ बाद ६७ (महेश तेजवानी नाबाद ३७, जितेश तिलोकचंदानी १०, पवन पंजाबी १-१६, मयूर ललवाणी १-२२).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *