रानकवी नामदेव जाधव यांना ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’

रानकवी नामदेव जाधव यांना ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’

बंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशन आयोजित ‘त्रिवेणी संगम’ कार्यक्रमात डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते वितरण
 
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा पहिलाच ‘बंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ सांगली जिल्ह्यातील पलूसचे रानकवी नामदेव जाधव यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ साहित्यिका आणि विचारवंत डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
 
प्रकाश रोकडे म्हणाले, “जाधव यांनी कवितांमधून शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिलांच्या सामाजिक न्यायासाठी सतत विद्रोह केला आहे. त्याचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत. बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन यांच्या येत्या २२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ‘त्रिवेणी संगम’ या विशेष कार्यक्रमात शब्दक्रांती पुरस्कार वितरण, कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘शब्द उभा रणांगणी’ या चौदाव्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, निमंत्रित कवींचे शब्दक्रांती कविसंमेलन होईल. साहित्यिक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. विजय ताम्हाणे, अरुण बोराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.”
 
“कवी संदीप कांबळे आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. कवी संमेलनामध्ये कैलास बोरकर (औरंगाबाद), बबन धुमाळ (दौंड), उदय क्षीरसागर (भिवंडी), शरयू पवार (हडपसर), प्रमोद जगताप (फलटण), विजय जाधव (शिरूर), विकास राऊत (चाकण) या निमंत्रित कवींसह पुण्यातील डॉ. भीम गायकवाड, मधुश्री ओव्हाळ, शंकर आथरे, मीना शिंदे, चंद्रकांत धस, संगीता झिंजूर्के, संतोष घुले आणि राजेंद्र कांबळे सहभागी होणार आहेत,” असेही रोकडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *