डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत

सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. आंबेडकरांचे विचार अत्यंत महत्वपूर्ण

मेघराज राजेभोसले यांचे मत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये अभिवादन सोहळा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूर्यगौरव सन्मान २०२४’ प्रदान करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते राजेभोसले यांना सन्मानित करण्यात आले.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील योगाचार्य बीकेएस अय्यंगार सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी सिनेपत्रकार अश्विनी कोळेकर-धायगुडे, ‘सूर्यदत्त’चे संचालक प्रशांत पितालिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, राजेश खन्ना, शीतल फडके, प्रा. वंदना पांड्ये यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेच्या प्रांगणातील डॉ. आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सूर्यदत्त संस्थेमध्ये अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भावी पिढीला डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची आणि त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या महामानवाच्या कार्यातून देशाला जे संविधान प्राप्त झाले; त्याचे महत्व कळावे, या उद्देशाने हा सोहळा आयोजिला आहे.”

चित्रपट क्षेत्रात राजेभोसले यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना काळात चित्रपट व नाट्य सृष्टीतील पडद्यामागील सर्व कलाकारांना केलेली मदत लक्षणीय आहे. कलाकारांसाठी सोयीसुविधा उभारण्यात त्यांचे योगदान आहे. कोल्हापूरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, तसेच बाधित घरांसाठी केलेले सहकार्य मोलाचे होते. निर्मात्यांचे नैराश्य घालवण्यासाठी विचारमंथन शिबिराचे आयोजन केले. विविध संस्थांवर महत्वपूर्ण पदे भूषवित असताना सामान्यांकरिता त्यांनी उभारलेले कार्य आदर्शवत असून, ते डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.



मेघराज राजेभोसले म्हणाले, “सूर्यदत्त संस्थेतर्फे डॉ. आंबेडकरांच्या नावाने होणारा हा सन्मान प्रोत्साहन देणारा आहे. ‘सूर्यदत्त’चे शैक्षणिक व सामाजिक कार्य मोठे आहे. गेल्या २५ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचा त्यांचा हा प्रवास दैदिप्यमान असाच आहे. संघर्षाशिवाय कोणतेही कार्य उभे राहत नाही. कोणत्याही क्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यावर भर द्यायला हवा. डॉ. आंबेडकरांच्या जीवनप्रवासातून शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष काम करताना अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. या महामानवाच्या अनुकरणीय गोष्टी समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचायला हव्यात.”



अश्विनी कोळेकर-धायगुडे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विचार व्यक्त केले. प्रशांत पितालिया यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. नीलिमा मगरे सूत्रसंचालन यांनी केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *