महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांच्या विचारांत समता, बंधुतेचा पुरस्कार

महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांच्या विचारांत समता, बंधुतेचा पुरस्कार

दिवाणी न्यायाधीश डॉ. के. आर. सिंघेल यांचे प्रतिपादन; दोन्ही महामानवांना सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये अभिवादन

पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून कार्यशाळेची सुरुवात झाली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिवादन केले.

या निमित्ताने सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये (लॉ कॉलेज) कोल्हापूर येथील सहदिवाणी न्यायाधीश डॉ. के. आर. सिंघेल यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचेही आयोजन केले होते. डॉ. सिंघेल यांनी उपस्थितांना आरक्षणाच्या तरतुदींवर प्रबोधन केले. संविधानात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित लोकांच्या विकासासाठीच्या विशेष तरतुदीवर भर देत डॉ. आंबेडकर यांनी केलेले कार्य त्यांनी अधोरेखित केले. दुपारच्या सत्रात डॉ. सिंघेल यांनी सायबर कायदा, त्याचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कायद्यातील करिअरविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

संचालक शीला ओक यांच्या मार्गदर्शनात सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या इयत्ता पाचवीतील ग्राहील खटाटे व अवनी पवार, इयत्ता आठवीतील निलय शंकर, अयान मोदी, स्वराली सवाईराम, आहन शाह या विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी भाषण करत त्यांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवले. प्राचार्य मिथिलेश शर्मा, डॉ. मोनिका सेहरावत यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे.”

“इंग्रजी सत्ता, दारिद्रय़, रोगराई, दुष्काळ, सावकारी फास, गुलामगिरी, शेतकऱ्यांची होरपळ यामुळे पिचलेल्या समाजाला महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा कृतिशील प्रयत्न केला. शिक्षणापासून ते लेखनापर्यंतच्या आणि स्त्री मुक्तीपासून ते सत्यशोधक समाजापर्यंतच्या अनेक क्षेत्रात महात्मा फुले यांनी उत्तुंग कामगिरी केली. या दोन्ही महामानवांच्या विचारांची झेप फार मोठी होती. समाज परिवर्तन का आणि कशासाठी करायचे याबाबतच्या त्यांच्या भूमिका पक्क्या होत्या,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *