पुणे : व्हिवज फॅशन स्कूल आयोजित इंटरनॅशनल किड्स, टीन्स फॅशन रनवे दुबई शोमध्ये सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या जिया नितीन पाटील हिने ‘बेस्ट रॅम्प वॉक वर्ल्ड वाईड’ हा किताब जिंकला. भारत, दुबई, मिलान, न्यूयॉर्क आणि लंडन येथे ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विविध देशातील मुला मुलींचा समावेश होता.
जिया सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकते. तिने राष्ट्रीय पोशाख फेरी आणि रॅम्प वॉक परिचय फेरी सादर केली. ती ‘इंटरनॅशनल फॅशन रनवे शो दुबई’ची विजेती ठरली. विजेत्याचा मुकूट मिळवण्यासह ‘बेस्ट रॅम्प वॉक वर्ल्ड वाईड’चा किताब जिंकला. तिच्या या दुहेरी यशाबद्दल तिला ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
“हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. कारण माझी मुलगी या स्पर्धेची विजेता ठरली आहे. तिच्या मेहनतीचे हे फळ आहे. वयाच्या १० व्या वर्षांपासून ती या क्षेत्रात परिश्रम करत आहे, शिकत आहे. मुलांना प्रोत्साहन देण्यासह त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम व समर्थन देणे आवश्यक आहे. त्याचा विलक्षण परिणाम मुलांच्या प्रगतीवर होतो,” असे मत जियाचे वडील नितीन पाटील यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी जियाच्या उज्वल यशाबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या. सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्राचार्या शीला ओक यांच्यासह तिच्या शिक्षकांनी, सहकारी विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पुस्तकी ज्ञानाबरोबरच सूर्यदत्त शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे, कलागुणांचे शिक्षण दिले जाते. त्यांचे छंद, आवडी जोपासण्याला प्रोत्साहन देण्यात येते. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मुलामुलींना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली जाते. जियाने मिळवलेले यश संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे.”