जागतिक एड्स दिनानिमित्त ‘सूर्यदत्त’मध्ये जागृतीपर कार्यक्रम

जागतिक एड्स दिनानिमित्त ‘सूर्यदत्त’मध्ये जागृतीपर कार्यक्रम

‘सूर्यदत्त’च्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या वतीने ‘जागतिक एड्स दिनी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

पुणे : “जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने सुरू झालेला जागतिक एड्स दिन दरवर्षी विशिष्ट संकल्पनेवर आधारित साजरा होतो. एड्सबाबत असलेली ‘सामाजिक विषमता दूर करणे’ ही यंदाची संकल्पना आहे. समाजात पसरलेली विषमता दूर करून एड्सचे समूळ उच्चाटन करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाउल आहे,” असे एचआयव्ही एड्स औषध तज्ज्ञ डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.
 
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित जागृतीपर कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मिलिंद कुलकर्णी बोलत होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

एचआयव्ही बाधित व्यक्तीना सहानुभूती आणि जागरूकतेचे प्रतीक म्हणून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना ‘रेड बो’चे वितरण करण्यात आले. डॉ. स्नेहल ठाकूर आणि डॉ. ऋचा वैद्य यांनी व्यक्तिगत समुपदेशन केले. प्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर आदी उपस्थित होते.

डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले, “सर्व वयोगटातील लोकांमध्ये एचआयव्ही संसर्गामुळे पसरणाऱ्या एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. एड्स हा जीवघेणा आजार असून, त्यावर अद्यापही उपचार सापडलेले नाहीत. काळजी घेणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. जगभरात एड्सच्या रुग्णांना चुकीची वागणूक दिली जाते. त्यांना अस्पृश्यासारखे वागवले जाते. अशा परिस्थितीचा सामना एड्सच्या रुग्णांसाठी वेदनादायी असतो. त्यामुळे त्यांच्याशी संवेदनशीलपणे वागायला हवे.”

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “एड्सचे वाढते प्रमाण, पाश्चात्य जीवनशैलीचा वाढणारा प्रभाव, आजारासंबंधी असणारे गैरसमज, त्यातून होणारा गोंधळ, एड्स बाधित लोकांना मिळणारी वागणूक हे सारे पाहता तरुणवर्गाला योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. तरुण मंडळींशी सातत्याने संवाद साधल्यानेच अनेकविध समस्यांवर मात करणे शक्य होईल.”
डॉ. सिमी रेठरेकर, प्रा. रेणुका घोसपुरकर, पूजा विश्वकर्मा आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. डॉ. कांचन गोडे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *