डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; ‘लॉकडाऊन : वास्तव व साहित्यिक नोंदी’वर परिसंवाद, कृतज्ञता सन्मान
पुणे : “मानवी अस्तित्वाचा शोध आणि वास्तवाचे भान लॉकडाऊनमध्ये मिळाले आहे. देशातील विविध संघटना, संस्थांनी जातीधर्माच्या, भाषेच्या पलीकडे जाऊन काम केले. या कठीण काळात माणुसकीचे दर्शन घडवले. राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवत समाजातील प्रत्येक गरजू व वंचित घटकांसाठी सेवाभावी कार्य उभारले,” असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
जय गणेश व्यासपीठ व उचित माध्यम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लॉकडाऊन : वास्तव आणि साहित्यिक नोंदी’ विषयावरील परिसंवादात डॉ. सबनीस बोलत होते. कोरोना काळात मदतीचा हात देणाऱ्या सेवावृतींचा कृतज्ञता सन्मान यावेळी डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. संजय चोरडिया, पियुष शहा, किरण सोनिवाल, विक्रांत मोहिते, भाऊ थोरात, रवींद्र भुजबळ, मयूर पोटे, विशाल ओव्हाळ आदी उपस्थित होते.
वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात झालेल्या परिसंवादात वैभव वाघ (लॉकडाऊनमधील सामाजिक संस्थांचे कार्य), वैद्य हरीश पाटणकर (वैद्यकीय सेवा अनुभव), डॉ. पद्मश्री पाटील (लॉकडाऊनमधील ताणतणाव आणि समुपदेशन), पराग पोतदार (लॉकडाऊनमधील सकारात्मक गोष्टी), महेश सूर्यवंशी (लॉकडाऊनमधील गणेश मंडळाचे कार्य), ज्ञानेश्वर जाधवर (लॉकडाउन – साहित्यिक नोंदी) आपली मनोगते मांडली. मुकुल माधव फाउंडेशन, विद्यार्थी सहायक समिती, वंचित विकास, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, अभि चॅरिटेबल ट्रस्ट, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, वैद्य हरीश पाटणकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, जावेद खान, अखिल मोहननगर मित्रमंडळ (धनकवडी), अष्टविनायक मित्रमंडळ (विश्रांतवाडी), महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ (सिटी पोस्ट), सेवा मित्र मंडळ (शुक्रवार पेठ) यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “वास्तव आणि कल्पनेच्या मिश्रणातून ज्ञानेश्वर जाधवर यांनी लिहिलेली ‘लॉकडाऊन’ कादंबरी समकालीन इतिहासाची साक्ष आहे. लॉकडाऊनमधील विविध घटनांचे पडसाद, माणुसकीचे आणि अमानुषतेचे दर्शन या कादंबरीतून घडते. वास्तवाला सामोरे जाण्याचे, त्याला भिडण्याचे आणि ते अभिव्यक्त करण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरच्या लेखणीत आहे. आजच्या निमित्ताने सन्मानित केलेल्या सेवावृत्तीचें कार्य एखाद्या नेत्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.” जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले. पियुष शहा यांनी आभार मानले.