कोहलर व रोटरी क्लब ऑफ पुणे रिव्हरसाईडतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे उद्घाटन

कोहलर व रोटरी क्लब ऑफ पुणे रिव्हरसाईडतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे उद्घाटन

पुणे : कोहलर कंपनी व रोटरी क्लब ऑफ पुणे रिव्हरसाईड आणि रोटरी क्लब ऑफ शेबॉयगन, अमेरिका यांच्यातर्फे पुणे शहर व जिल्हा परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतागृह, स्वच्छ पाण्याची सोय आदी उपक्रमांचे उद्घाटन कोहलरच्या मानव संसाधन आणि शाश्वत विकास विभागाच्या उपाध्यक्षा लॉरा कोहलर यांच्या हस्ते करण्यात आले. अमेरिकेतील सीएसआर टीम नुकतीच भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी या उपक्रमांची पाहणी केली.

पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी, मुलींसाठी व कर्मचार्‍यांसाठी असे स्वतंत्र तीन स्वच्छतागृह उभारण्यात आले. कोहलरच्या सीएसआर टीममधील सदस्य सिंडी, डॅनियल, जेनिफर यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ अधिकारी पुनीत गर्ग, पंकज कुमार राय, समीर बोंद्रे, राजेश अरोरा, बिनू जॉन, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे (पीडीइए) संयोजक निंबाळकर सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कळमकर सर, रोटरीचे सचिव किरण ग्रेवल, संस्थेचे संचालक उमेश कुमार जालान आदी उपस्थित होते.

उमेश कुमार जालान म्हणाले, “सोरतापवाडी शाळेत असलेली स्वच्छतागृहाची गरज लक्षात घेऊन कोहलर कंपनी व रोटरी क्लब ऑफ पुणे रिव्हरसाईडतर्फे त्याची उभारणी करण्यात आली. स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा, सोकपिट अशा सर्व सोयी करून देण्यात आल्या. ही शाळा १९३० पासून प्राथमिक ते सातवी पर्यंतचे मोफत शिक्षण देत आहे. सध्या येथे त्या गावातील २१५ विद्यार्थी शिकत आहेत.”

“वाघोली येथे गेल्या २० वर्षांपासून पाण्याचा फार मोठा प्रश्न असल्याने येथील विष्णुजी शेकुजी सातव उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वच्छतागृहांची सोय नव्हती. येथे शाळेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने संपूर्ण पाणी प्रकल्प उभारून पाणी व स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यात आला. या शाळेतील ८५० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. येथे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण मोफत देण्यात येते. पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्थाही येथे उभारण्यात आली आहे. हे सर्व विजेच्या वापराशिवाय केले आहे. पाणी साठ्यासाठी विविध टाक्या, पंप्स, पाणी वाटपासाठी पाईप, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, पिण्याच्या पाण्याची सोय आदि सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. दोन सॅनिटरी नॅपकिन डिस्पेंसर व तो कचरा जाळून टाकणारी व्यवस्था मुलींच्या स्वच्छतागृहात करण्यात आली आहे.” असे जालान यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published.