सुनील कुलकर्णी यांचा सल्ला; ७७ व्या स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये मार्गदर्शन
पुणे : “सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे क्रांती झाली आहे. प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्याने सगळ्या क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे नवतंत्रज्ञान अवगत करून, त्याच्याशी जुळवून घेत आपण नवी कौशल्ये आत्मसात करायला हवीत. स्वतःला सातत्याने ‘अपग्रेड’ करत जाणे महत्वाचे आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक, फिडेल टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी केले.
विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण व त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. आपटे वसतिगृहात झालेल्या कार्यक्रमावेळी फिडेल सॉफ्ट टेकच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी, आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, ‘गर्जे मराठी ग्लोबल’चे माधव दाबके, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, संजय अमृते, रत्नाकर मते, मनोज गायकवाड, डॉ. ज्योती गोगटे, सुप्रिया केळवकर, दिनकर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, यांच्यासह विश्वस्त मंडळ, कार्यकर्ता मंडळ, आजी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समितीच्या वसतिगृह व्यवस्थापन ऍपचे अनावरण करण्यात आले.
सुनील कुलकर्णी म्हणाले, “आपल्यातील क्षमता ओळखून त्या विकसित करण्यावर भर द्यावा. न्यूनगंड बाजूला ठेवून चांगले शिक्षण घ्यावे. मोठी स्वप्न पाहून त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहा. उद्योगशील व संकटांवर मात करण्याची वृत्ती जोपासा. भाषेवर प्रभुत्व मिळवतानाच इतर विदेशी भाषा शिका. त्यामुळे तुम्हाला जागतिक स्तरावर तुमचे स्थान निर्माण करण्यास मदत होईल.”
प्राची कुलकर्णी म्हणाल्या, “तुमच्याकडे कौशल्य, जिद्द आणि समाजभान असेल, तर जागतिक स्तरावर अनेक नोकरी-व्यवसायाच्या संधी आहेत. त्यासाठी अनौपचारिक प्रशिक्षण खूप गरजेचे आहे. तुम्ही सर्वजण खूप आश्वासक व उज्ज्वल भविष्य असलेली पिढी आहात. जपानी लोकांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. चांगले शिका, कौशल्य आत्मसात करा आणि देशासाठी योगदान द्या.”
तुषार रंजनकर म्हणाले, “ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या या मुलांना योग, चांगला आहार, कौशल्याचे प्रशिक्षण, उद्योजकता विकास प्रशिक्षण समितीमध्ये दिले जाते. युवक परिवर्तनाची केंद्रे म्हणून आम्ही वसतिगृहे चालवतो. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करून देशाच्या विकासात योगदान देऊ शकणारी पिढी घडवण्याचे काम विद्यार्थी साहाय्यक समिती करत आहे.”
सूत्रसंचालन समीक्षा नानेकर व अंगारकी मांडे हिने केले. भाग्यश्री मंडवाले हिने आभार मानले.