जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय
पुणे : शिवणे येथील शिवकमल प्रेस्टिज या इमारतीच्या पार्किंगमधील १३ दुचाकी आणि दोन रिक्षा अशी १५ वाहने आगीत जळून खाक झाली. ही घटना बुधवारी (१२ जानेवारी) पहाटे पाच वाजता घडली. कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावून वाहने जाळल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टिज ही पाच मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे पाच वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला अग्निशामक मिळाली. पाठोपाठ दल आणि पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहने पेटली होती. जवानांनी तातडीने ही आग विझविली.
अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी सांगितले की, पार्किंगमध्ये अनेकदा शॉटसर्किट
होऊन तेथील वाहनांना आग लागल्याचे दिसून येते. मात्र, या इमारतीतील विद्युत मीटरच्या बॉक्सना आगीची झळ पोहोचली नाही. त्यामुळे तेथून आग लागली नाही. ज्या वाहनाला पहिली आग लागली, त्याच्यावरील पार्किंगमधील ट्युबलाइट जळाली आहे.
आवाज आल्याने आम्ही खाली आलो, तेव्हा सर्व वाहने एकाच वेळी पेटलेली होती, असे या इमारतीतील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत १३ दुचाकी आणि दोन रिक्षा जळून खाक झाल्या होत्या.