पुणे: लाडक्या बहिणींना छेडणाऱ्या रोडरोमियो व विकृत मानसिकतेला ठेचणाऱ्या, महिला अत्याचाऱ्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या मनसैनिक गणेश भोकरे (Ganesh Bhokare) यांना कसबा मतदारसंघात सुरुवातीपासूनच वाढता पाठिंबा आहे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या गणेश भोकरे यांना आपला पाठीराखा मानून मतदारसंघातील माता-भगिनींनी यंदाच्या निवडणुकीत आपल्या भावाला विधानसभेत पाठविण्याचा निश्चय केल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे आधी दुरंगी वाटणारी ही लढत आता तिरंगी व चुरशीची झाली आहे. अकार्यक्षम, भ्रष्ट, मुजोर आणि कृतघ्न लोकांना वैतागलेले कसबावासीयांमध्ये यंदा इमानदार कार्यकर्त्यालाच आमदार बनविण्याची चर्चा जोर धरत आहे. त्यातही महिलांचा टक्का लक्षणीय असल्याने भोकरे यांचा उत्साह वाढवणारा आहे.
जनसामान्यांच्या न्यायासाठी, महिलांच्या हक्कासाठी, तरुणांच्या रोजगारासाठी आणि ज्येष्ठांच्या सेवेसाठी राबणारा हा कार्यकर्ता कसब्यातील घराघरात पोहोचत आहे. आजवर केलेले काम, भविष्यात कसबाचा लौकिक परत मिळवण्यासाठीच्या योजना सांगत आहे. भोकरे यांच्या विकासाभिमुख प्रचाराचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. लाडक्या बहिणींसह ज्येष्ठ, तरुणांकडून त्यांना प्रतिसाद मिळत आहे. शालेय व महाविद्यालयीन मुलींची छेड काढणाऱ्या, तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या, विकृत मानसिकतेने महिलांकडे पाहणाऱ्या नराधमांना भोकरे यांनी वेळोवेळी चोप देत, प्रशासनाविरोधात आंदोलने करीत महिलांच्या सुरक्षेची हमी घेतली आहे. भोकरे यांची हीच गोष्ट लाडक्या बहिणींना भावलेली दिसते.