जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणी केंजळे बंधूंवर गुन्हा दाखल; दोन दिवसांची पोलीस कोठडी

जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणी केंजळे बंधूंवर गुन्हा दाखल; दोन दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा भावांवर गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे. गणेश केंजळे व महेश केंजळे (दोघे रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने अधिक तपासासाठी सोमवारपर्यंत केंजळे बंधूना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी उद्योजक मिलिंद महाजन यांनी (रा. अभिलाषा अपार्टमेंट, पाषाण, पुणे) फिर्याद दिली आहे. पौड पोलिसांनी केंजळे बंधूंवर भारतीय दंड संहिता ४०६, ४२० आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भोसरी येथील लघुउद्योजक मिलिंद महाजन यांनी २०११ मध्ये गणेश व महेश केंजळे यांचेकडून मौजे भुकूम, ता. मुळशी येथील गट नं. ३०६ मधील २५ गुंठे जागा विकत घेतली होती. ८५ लाख रुपयांत हा व्यवहार ठरला. महाजन यांनी केंजळे यांना टप्प्याटप्प्याने धनादेशाद्वारे संपूर्ण रक्कम दिली. त्यानुसार उपनिबंधक कार्यालय येथे खरेदीखत झाले. खरेदीखताप्रमाणे केंजळे यांनी एक महिन्याच्या आत ७/१२ वर महाजन यांचे नाव लावून देणे आवश्यक होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही केंजळे यांनी ७/१२ उताऱ्यावर नाव लावले नाही.

पुढे फिर्यादी महाजन आजारी पडल्याने उपचारासाठी त्यांनी ही जमीन विक्री करण्याचे ठरवले. परंतु, ७/१२ उताऱ्यावर नाव नसल्याने त्यांना ती जमीन विकता येत नव्हती. तेव्हा केंजळे यांनी ही जमीन विकू असे सांगून ग्राहक शोधले. मात्र, ग्राहकांना महाजन यांचे नाव ७/१२ असून त्यांच्यापुढे क्षेत्र शिल्लक नसल्याचे आढळले. त्यावर केंजळे यांनी ही तांत्रिक चूक असून, तहसीलदारांकडून दस्तावेजात दुरुस्ती करून घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, गट न. ३०६ मध्ये जागेचे क्षेत्र केवळ ३ हेक्टर ५८ आर असताना ४ हेक्टर ११ आर एवढी जागा कागदोपत्री विकल्याचे तलाठी यांच्या अहवालात स्पष्ट झाले. त्यानुसार तहसीलदारांनीही निकाल दिला. केंजळे यांनी फेरफार करून अस्तित्वात नसलेली २५ आर जागा ८५ लाखाला विकल्याचे दिसून आले. तसेच खरेदी खतापोटी घेतलेले पैसे, स्टँप ड्युटी, वकील फी असे एकूण ९६ लाख १५ हजार ९४० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

याची नोंद घेत गणेश व महेश केंजळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *