फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे २५०० कातकरी कुटुंबाना अन्नधान्य

फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे २५०० कातकरी कुटुंबाना अन्नधान्य

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे वनवासी कल्याण आश्रम यांच्या सहकार्याने २५०० आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाना अन्नधान्य वाटप करण्यात आले. मावळ, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव या सहा तालुक्यातील कातकरी कुटुंबांचा यात समावेश आहे. मावळ तालुक्यातील टेमघर धरण पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे या गावातून या उपक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष (कमर्शियल्स) बी. आर. मेहता, वनवासी कल्याण आश्रमाचे मनोज पोचत, दिलीप मेहता, प्रकाश किचडे, विनायक खाडे, महेश भुस्कुटे, मिलिंद करमरकर, सुरेश हणमंते, सुनील भोसले, स्थानिक समन्वयक विशाल भुरूक, मुकुल माधव फाउंडेशनचे वरिष्ठ प्रतिनिधी जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

कातकरी समाजाचे उपजीविकेचे साधन हे मुख्यतः रानावनातील मध, मेण, डिंक, आयुर्वेदिक औषधी, मासेमारी असते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार गेला आहे. दुसऱ्या लाटेतही रोजंदारी गेल्याने या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन वनवासी कल्याण आश्रमाने मुकुल माधव फाउंडेशनकडे मदतीचा हात मागितला. फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रितू प्रकाश छाब्रिया यांनी तात्काळ होकार देत २५०० कुटुंबाना पंधरा दिवस पुरेल इतका शिधा दिला, असे महेश भुस्कुटे यांनी सांगितले.

बी. आर. मेहता म्हणाले, “कातकरी समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन फाउंडेशनने तातडीने हे अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. गेल्या वर्सभरात फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनने देशभरातील सर्वच स्तरातील वंचित घटकांना अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य व अन्य जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे कार्य केले आहे.”

रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “रानावनातील मेवा गोळा करून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कातकरी समाजाची अडचण वनवासी कल्याण आश्रमाने मांडली. डोंगराळ भागात राहणाऱ्या या समाजाला मदतीचा हात देताना आनंद होतो. भविष्यातही समाजातील सर्वच वंचितांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *