शिक्षणाला सर्जनशीलता, कल्पकता व नाविन्याची जोड हवी

शिक्षणाला सर्जनशीलता, कल्पकता व नाविन्याची जोड हवी

प्रा. मिलिंद जोशी यांचे मत; डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘स्मार्ट टेक करिअर्स’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : उद्योग क्षेत्राला मनुष्यबळाची मोठी गरज असताना बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. कुशल मनुष्यबळाचा अभाव या विरोधाभासाचे कारण आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचे उपयुक्त मनुष्यबळामध्ये रुपांतर करण्याचे आव्हान शिक्षण क्षेत्रासमोर आहे,” असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. यशाला ‘शॉर्टकट’ नसतो; सर्जनशीलता, कल्पकता व नाविन्याची जोड देऊन स्वत:ला सिद्ध करण्याची गरज असल्याचेही जोशी यांनी नमूद केले.
 

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या आपटे वसतिगृहात नितीन प्रकाशन प्रकाशित आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘स्मार्ट टेक करिअर्स’ या ५१ व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, बेलराईज इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, प्रकाशक नितीन गोगटे यांच्यासह समितीचे विश्वस्त, कार्यकर्ते, पर्यवेक्षक, आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

 
डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, “तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना संवादही महत्त्वाचा आहे. अभ्यासक्रम स्मार्ट नसतो, तर व्यवस्था स्मार्ट असते. एखाद्या प्रश्नाकडे सकारात्मकपणे बघताना जीवनाचे तत्त्वज्ञान कळते. तंत्रज्ञानाधारित करिअरचे विविध स्मार्ट पर्याय आहेत. डॉ. शिकारपूर यांचे मराठी भाषेतील हे पुस्तक सामान्य विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.”
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या युगात वेळ हेच तुमचे भांडवल आहे. युवा पिढीने ‘टाईमपास’ या शब्दापासून दूर राहत स्वतःचा वेळ सत्कारणी असावा. अभ्यासाचे, करिअरचे नियोजन करावे. नवी कौशल्य, तंत्रज्ञान आत्मसात करावीत. संभाषण कौशल्य आणि बहुभाषिकता खूप गरजेचेआहे. कुशल, बहुभाषिक तरुणांना करिअरच्या अनेक संधी खुणावत आहेत.”
जागतिकीकरणाच्या रेट्यात स्वयंशिस्त, वेळेचे नियोजन, समूह व्यवस्थान आणि उत्तम आकलन या चतु:सूत्रीचा अवलंब केला, तर हमखास यश मिळते. उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता असल्याने सर्व स्तरात कौशल्य विकासावर भर दिला जात आहे, असे सुप्रिया बडवे म्हणाल्या.

तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, समितीमधील ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास, मूल्ये व संस्कारांचे शिक्षण देण्यावर भर दिला जातो. आता समितीतर्फे उद्योजकता विकास प्रशिक्षण देत असून, दरवर्षी किमान दहा टक्के विद्यार्थी उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. समितीच्या कार्यकर्त्या सुप्रिया केळवकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनी अंगारकी मांडे हिने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *