‘रंगारंग’मधून घडले सिंधी साहित्य-संस्कृतीचे दर्शन

‘रंगारंग’मधून घडले सिंधी साहित्य-संस्कृतीचे दर्शन

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी व भारतीय सिंधू सभेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम व सन्मान

पुणे : ‘जय झुलेलाल, लाल झुलेलाल’ याचा जयघोष… सिंधी लोककला, नृत्याचे बहारदार सादरीकरण… गायन-नृत्यातून घडलेले देशभक्ती दर्शन… गीतांमधून फाळणीच्या जखमांना केलेला स्पर्श… सिंधी समाजातील बालकलाकार, तरुणांच्या नृत्याला उपस्थितांनी दिलेली दाद… समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या सिंधी बांधवांचा गौरव… अशा आनंदमय वातावरणातील ‘रंगारंग’ कार्यक्रमातून सिंधी साहित्य व संस्कृतीचे दर्शन घडले.
 
निमित्त होते, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई व भारतीय सिंधू सभेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व सन्मान सोहळ्याचे! वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात आयोजित या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसंगी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे सदस्य व भारतीय सिंधू सभा महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश हेमनानी, भारतीय सिंधू सभा पुणेचे अध्यक्ष अवत जेठवानी, कार्याध्यक्ष जितू अडवाणी, सचिव जितेंद्र हिरानंदानी, युवा आघाडीचे अध्यक्ष डॉ. बंटी धर्मा, महिला आघाडीच्या अध्यक्षा गौरी जेसवानी आदी उपस्थित होते.
 
 
महेश सुखरामानी म्हणाले, “सिंधी भाषा, संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी अकादमी प्रयत्नशील आहे. विभाजन झाल्यानंतर सिंधी समाज देशभर विखुरला गेला. पुन्हा नव्या जोमाने उभा राहत सिंधी समाजाने सर्वच क्षेत्रात नाव कमावले आहे. ज्ञानशील व दानशूर असलेल्या सिंधी समाजातील युवा पिढीने आपला वारसा जपला पाहिजे. घरात व अन्यत्र शक्य तिथे सिंधी भाषेत संवाद करावा. पाच हजार वर्षांपूर्वीपासूनची सिंधी संस्कृती जपण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवेत.”
 
सुरेश हेमनानी म्हणाले, “भारतीय सिंधू सभेच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून समाजात एकता वाढावी, मुलांमध्ये भाषा व संस्कृतीची बीजे पेरावीत, या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात समाजातील अनेक आदर्श व उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न असतो. अकादमीच्या माध्यमातून सिंधी भाषा, संस्कृती, सिंधी साहित्यिक, कलाकार यांना प्रोत्साहन देण्यात येते.”
 
 
गोवर्धनलाल शर्मा, मनोहर फेरवानी यांच्यासह अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. अवत जेठवानी यांनी प्रास्ताविक केले. जीत हिरानंदानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जितू अडवाणी यांनी आभार मानले. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *