वंचित विकास संस्थेतर्फे शनिवारी ‘अभया’चा दशकपूर्ती सन्मान सोहळा

वंचित विकास संस्थेतर्फे शनिवारी ‘अभया’चा दशकपूर्ती सन्मान सोहळा

पुणे : वंचित विकास संचालित ‘अभया’ हा एकल महिलांचा मैत्रीगट आहे. ‘अभया’ ही एक स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा हुंकार देणारी एक चळवळ आहे. या चळवळीचा दशकपूर्ती सन्मान सोहळा येत्या शनिवारी (दि. २५) सायंकाळी ५ वाजता कर्वे रस्त्यावरील अश्वमेध हॉल येथे होणार आहे. परिस्थितीशी दोन हात करुन मार्ग काढणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित विकासच्या कार्यवाह संचालक मीना कुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.

 
मीना कुर्लेकर म्हणाल्या, “या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उन्मेष प्रकाशनच्या संचालक श्रीमती मेधा राजहंस येणार आहेत. पत्रकार, निवेदक, लेखिका श्रीमती माधुरी ताम्हणे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सुनीता बनकर, मिलिंद उर्फ मिलन लबडे, दैवशाला थोरबोले, शोभा वाईकर, वंदना अवघडे यांना अभया सन्मान, तर दीपिका जंगम यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. तसेच यावेळी ‘अभया’च्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार आहे.”
 
“एकल महिलांना विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, बिना लग्नाची अशा शब्दांनी दुखवू नये. जखमी करू नये. त्याऐवजी ‘अभया’ या नावाने संबोधावे हा विचार आम्ही व अभयातील महिलांनी मांडला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रातून याला लेखी पाठिंबा आला. आम्ही हे सर्व शासन दरबारी पोहोचवले आहे. एकल महिलांना ‘अभया’ या नावाने संबोधावे असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सकारात्मक प्रतिसाद आला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही यासंबंधीचे निवेदन सादर केले आहे,” असे मीना कुर्लेकर यांनी सांगितले.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *