पुरस्कारप्राप्त ‘बारह बाय बारह’ चित्रपट शुक्रवारपासून (दि. २४) प्रेक्षकांच्या भेटीला

पुरस्कारप्राप्त ‘बारह बाय बारह’ चित्रपट शुक्रवारपासून (दि. २४) प्रेक्षकांच्या भेटीला

वाराणसीतील ‘डेथ फोटोग्राफर’च्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा : गौरव मदान
 
 
 
पुणे : जगभर भ्रमंती करत ४० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारप्राप्त केलेला ‘बारह बाय बारह’ हा चित्रपट शुक्रवारी (दि. २४) देशभरात प्रदर्शित होत आहे. लेखक-दिग्दर्शक गौरव मदान व सनी लाहिरी यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पुण्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे गौरव आणि सनी दोघेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. आमदावाद पिक्चर्सच्या जिग्नेश पटेल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गौरव मदान, सनी लाहिरी व अभिनेत्री भूमिका दुबे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत चित्रपटाविषयी संवाद साधला.
 
गौरव मदान म्हणाले, “ही एक १६ एमएम मध्ये चित्रित केलेली दुर्मिळ फिल्म आहे. प्राचीन अशा वाराणसीतील मृत व्यक्तींचे छायाचित्र काढणाऱ्या एका जिवंत फोटोग्राफरच्या दृष्टीकोनातून शहराचे दर्शन घडवणारा हा चित्रपट आहे. वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर अंत्यविधी, मृत व्यक्तींचे छायाचित्रे काढण्याचा व्यवसाय असलेल्या ‘डेथ फोटोग्राफर’च्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. याच डेथ फोटोग्राफरची वाराणसी दौऱ्यात भेट झाली आणि आम्हाला या विषयावर चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक डेथ फोटोग्राफरवर ओढवलेली परिस्थिती आणि त्यातून त्याची होणारी फरफट, प्राचीन परंपरा व आधुनिकता यांच्यातील संघर्ष अतिशय कलात्मकपणे मांडण्याचा प्रयत्न यातून केला आहे. कथा, दिग्दर्शन, चित्रण या सगळ्याच बाबींचे कौतुक जगभरातून झाले आहे.”
 
“पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार, तर डायोरामा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट फिचर फिल्म पुरस्कार या चित्रपटाला मिळाला. टीव्हीएफवरील ‘हाफ सीए’मधील ज्ञानेंद्र त्रिपाठी, नेटफ्लिक्सवरील सोनी चित्रपटातील गीतिका विद्या ओहलान, विधू विनोद चोपडा यांच्या बारावी फेलमधील हरीश खन्ना, मोतीचूर चकनाचूर मधील भूमिका दुबे व आकाश सिन्हा यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. येत्या शुक्रवारपासून देशभरातील विविध चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे,” असे सनी लाहिरी यांनी नमूद केले.
 
‘मीना’ची भूमिका साकारलेल्या भूमिका दुबे हिने सांगितले की, ‘सत्य घटनांवर आणि अस्तित्वात असलेल्या चरित्रावर हा चित्रपट आहे. एक ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आलेल्या वाराणसीच्या कथानकात काम करणे माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. अंत्यविधी, माणसाचा शेवटचा फोटो काढण्याच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या या फोटोग्राफरची जीवनकहाणी प्रेक्षकांना भावेल, अशी आशा असल्याचे भूमिका म्हणाली. 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *