महाराष्ट्र दिनी बच्चेकंपनीने अनुभवले स्वराज्याचे ‘रणांगण’

महाराष्ट्र दिनी बच्चेकंपनीने अनुभवले स्वराज्याचे ‘रणांगण’

पुणे : स्वराज्याची पताका उंचच उंच फडकावी म्हणून आजन्म प्रेरणास्थान असलेले शिवराय, स्वराज्यासाठी प्राण तळहातावर घेवून लढलेले मावळे, शिवरायांच्या जयघोषात सर केलेले गड किल्ले… तीच उर्मी, तोच उत्साह आणि तीच प्रेरणा अनुभवत बच्चेकंपनीने स्वतः शिवरायांचा मावळा बनून महाराष्ट्र दिनी स्वराज्याचे ‘रणांगण’ अनुभवले.

मिती इन्फोटेक निर्मित, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘मावळा’ या बोर्डगेमतर्फे शुभारंभ लॉन्स येथे आयोजित घे भरारी प्रदर्शनात भव्य रणांगण साकारले होते. महाराष्ट्र दिनी रंगलेल्या या ‘रणांगण’ खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवजन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा प्रवास प्रत्येक मुल शिवबांचा मावळा म्हणून करत होता. प्रत्येक टप्प्यावर मिळणारे पराक्रमी मावळ्यांचे कार्ड, त्यावरील सनावळी आणि त्या योद्ध्याचा पराक्रम वाचून मुलांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक दिसून आली. खेळातील चुरस, वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळणाऱ्या व गमावल्या जाणाऱ्या शिवमुद्रा यामुळे जशी खेळाची गंमत वाढत होती, तसेच इतिहास व गणिताचे धडेही मुले नकळत हसत खेळत गिरवत होते.

प्रत्येक गड किल्ला सर केल्यावर छ्त्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव या गर्जना मुले अगदी बेंबीच्या देठापासून देत ती ऊर्जा अनुभवत होते. हा महाराष्ट्र जो छत्रपतींनी घडवला त्याची प्रेरणा या नव्या पिढीला देणाऱ्या उपक्रमाने मुले व पालक भारावले. मावळा पगडी, भगव्या, निळ्या, हिरव्या रंगाचे कॉस्च्युम घालून हातात तलवार, ढाल घेऊन फोटो काढण्याची मजा बच्चेकंपनीने लुटली.

‘मावळा’चे निर्माते अनिरुद्ध राजदेरकर म्हणाले, “हे जिवंत रणांगण अनुभवून मुले भारावली आहे. लॉनवर साकारलेले सर्वात भव्य असे हे रणांगण आहे. मुलांना एकीचे महत्व अधोरेखित करणारा आणि हसत-खेळत, मजा करत शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याची संधी मुलांना मिळाली. चार दिवसात हजारो मुलांनी या रणांगणावर ‘मावळा’ बनून खेळण्याचा आनंद लुटला.” राहुल कुलकर्णी, नीलम उमराणी-एदलाबादकर यांनी या घे भरारी प्रदर्शनाचे संयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.