‘पुरुष वेश्या’ मराठी कादंबरीचा नायक होणे क्रांतिकारी

‘पुरुष वेश्या’ मराठी कादंबरीचा नायक होणे क्रांतिकारी

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; डॉ. माधवी खरात लिखित ‘जिगोलो’ कादंबरीचे प्रकाशन

पुणे : “आंबेडकरी साहित्य म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला शिव्या घालणे नाही, तर त्यापलीकडे स्त्रीवादी प्रश्न, स्त्रीशी निगडित पुरुषाचे प्रश्न, स्त्रीच्या मादी असण्याचे प्रश्न, सन्मानाने जगण्याचे हक्क, माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा अशा कितीतरी गोष्टी आंबेडकरी साहित्यात असणे गरजेचे आहे. लैंगिकतेवर भाष्य करणारे साहित्य मराठी साहित्यात अभावाने दिसते. अशा प्रकारचे नाजूक विषय हाताळणे आणि पुरुष वेश्या हा मराठी कादंबरीचा नायक होणे हे क्रांतिकारी आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

फोरसाईट फाउंडेशन आणि चेतक बुक्स यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी खरात यांच्या ‘जिगोलो’ कादंबरीचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, फोरसाईट फाउंडेशनचे डॉ. दिनकर खरात, चेतक बुक्सचे कुणाल हजारी, सुधीर भोंगळे आदी उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “डॉ. खरात यांची कादंबरी विस्फोटक, स्त्री-पुरुषांच्या सेक्स आणि संवादाचा गुंता आहे. न बोलला जाणारा, चर्चेत न येणारा प्रश्न आहे. सांस्कृतिक दडपण, नीतिमत्ता यात अडकून पडलेल्या स्त्रीचे दुःख समोर येत नाही. पुरुष वेश्या सर्वत्र असून, ते चांगले की वाईट हे लेखिका सांगत नाही. वास्तव मांडण्याचा प्रयत्न आहे. सेक्ससाठी जातीपातीचे बंधन नाही. पुरुष बऱ्याचदा नीरस, रुक्ष व अरसिक वागतात. परिणामी, अनेक संसार उद्धवस्त होतात. या गुंत्यांविषयी उद्बोधन व्हायला हवे. राजकारण, समाजकारण सारेच नागवे होत असेल तर फक्त लैंगिक संबंध हाच विषय नैतिकता आणि संस्कृतीच्या नावाखाली लपवून ठेवले जात असतील, तर संस्कृती कशी जपली जाईल. संस्कृती तकलादू अधिष्ठानावर टिकत नसते. सेक्ससंदर्भातील कोंडी फोडणे काळाची गरज आहे.”

सुनिताराजे पवार म्हणाल्या, “जागतिकीकरणाने जग पुढे गेले असले, तरी अनेक नवे प्रश्न उद्भवले आहेत. वेश्या हा विषय येतो, तेंव्हा फार काही चांगल्या भावना मनात येत नाहीत. त्यातही पुरुष वेश्या हा विषय साहित्यात कदाचित पहिल्यांदाच येत असावा. आपली संस्कृती भोगावर नव्हे, तर त्यागावर आहे. त्यामुळे असे विषय आपल्या भुवया उंचावणारे वाटतात. पण हे सत्य आहे. लघु कथेतील मर्यादा कादंबरीत नसते. पैशाने समाधान विकत घेता येत नाही, हेच या कादंबरीतून समजते. अत्यंत बोल्ड विषय अत्यंत संयत पद्धतीने लेखिकेने मांडला आहे. हेच कादंबरीचे बलस्थान आहे. जोवर सामाजिक घुसळण होत नाही, तोवर त्यावर उपाय शोधले जाऊ शकणार नाही.”

डॉ. माधवी खरात म्हणाल्या, “स्त्रीच्या वेदना हजारो काळापासून खूप मोठ्या होत्या. पण हा विषय ठरवून घेतला नाही. ओघाने संपर्कात आलेल्या एका मुलाने माझी विचारांची पातळी बदलली. अशा मुलांची एजंसी त्यांच्यावर खूप काम करतात आणि खूप पैसे कमावतात. जगण्याची जीवनाची आगतिकता, जीवन एवढे खोल असते हे तेव्हा जाणवले. विसंगती जीवनाचा भाग असते. अनेक राष्ट्रांमध्ये ‘जिगोलो’ हा नवीन भाग नाही. मनातला सुसंस्कृतपणा कायम असतो. पण अपरिहार्यता त्यांना तिथे आणते.”

संजय आवटे म्हणाले, “एवढा नाजूक विषय लेखिकेने धीटपणे हाताळला याचे कौतुक वाटले. आपल्या दांभिक समाजात आपण ठरवून काही बोलत नाही. पण हा विषय महत्त्वाचा आहे. इंग्रजीत असे विषय आले आहेत. पण मराठीत असा विषय घेऊन ‘जिगोलो’ला नायक करणे ही मोठी गोष्ट आहे. मराठी साहित्यात प्रगल्भ विषय व मांडणी आणणे गरजेचे आहे. जर जगणे थेट आहे, तर लेखन का थेट नको. धीटपणे बोलले आणि मांडले पाहिजे. खुलेपणाने माणसे वाचता आले नाही, याबाबत बोलले गेले नाही, म्हणून साहित्य मागे राहिले आहे.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. “साहित्यिकाने भूमिका घ्यायला हवी. तटस्थ राहणे हा भ्याडपणा आहे. समाजाला अराजकतेतून बाहेर काढून दिशा दर्शन करण्याचे काम साहित्यिकाने करावे,” असे त्यांनी सांगितले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ दिनकर खरात यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.