उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणारे ‘जीआयबीएफ’चे कार्य कौतुकास्पद

उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणारे ‘जीआयबीएफ’चे कार्य कौतुकास्पद

भगतसिंह कोश्यारी यांचे मत; ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे ‘बिझनेस एक्सलन्स अवार्ड’चे वितरण

पुणे : “जागतिक स्तरावरील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणून, त्यांना उद्योग वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे (जीआयबीएफ) कार्य कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘बिझनेस एक्सलन्स अवार्ड’चे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी इजिप्‍तचे मुंबईतील वाणिज्यदूत एतिया अबू एल्नागा, बांगलादेशचे मुंबईतील उपउच्चायुक्‍त मोहम्मद लूतफोर रहमान, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, समन्वयिका दीपाली गडकरी, डॉ. योगेश दुबे आदी उपस्थित होते. यशस्वी उद्योजक, कलाकार व कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, उद्योजक डोमा साई, कपिल पाठारे, निरंजन हिरानंदानी, डॉ. योगेश जाधव, महिला उद्योजिका डॉ. स्वाती मुजुमदार, ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “कोरोना संसर्गाने केवळ भारतालाच नाही, तर सर्व जगाला ग्रासले आहे. विविध देशांमध्ये आर्थिक वर्चस्वासाठी शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू असताना कोरोनाने सर्व जगाला एक होऊन संसर्गाशी एकत्रितपणे लढण्यास प्रवृत्त केले आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. अशावेळी सर्वांनी खांद्याला खांदा लावून सहकार्य केले, तसेच निरंतर जागरूकता व जबाबदार वर्तन ठेवले, तर संकटाचा धैर्याने सामना करता येईल. भारताने एकेकाळी जगाचे आध्यात्मिक नेतृत्व केले आहे. बौद्ध धर्माची निर्मिती याच भूमीत झाली आणि त्याचा जगभर प्रचार झाला. विश्‍वबंधुत्व ही भारताची शिकवण असून, जगाला आज महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने जाण्याची गरज आहे.”

प्रास्ताविकात डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “लघु व मध्यम क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. ‘जीआयबीएफ’ने गेल्या काही वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रातील उद्योगांना एकत्रित आणत व्यवसाय वृद्धीत भर घातली आहे. विविध देशांतील वाणिज्यदूत, मंत्री आणि उद्योजक यामध्ये असल्याने उद्योगांना कोरोनानंतर पुन्हा प्रगतीपथावर जाण्यासाठी चांगली मदत होत आहे.” सूत्रसंचालन नील अचल यांनी केले. डॉ. योगेश दुबे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *