बालगोपाळ, मावळ्यांनी फोडली खेळणी दहीहंडी

बालगोपाळ, मावळ्यांनी फोडली खेळणी दहीहंडी

जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशनतर्फे अनाथ, दुर्गम भागातील मुलांना करणार खेळणी वाटप

पुणे : बालगोपाळ व छत्रपती शिवरायांच्या बाल मावळ्यांनी खेळण्यांची अभिनव दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ आणि नवयुग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव बालगोपाळ खेळणी दहीहंडीचे आयोजन केले होते. मावळा पगडी परिधान केलेले शालेय विद्यार्थी व बाळगोपाळांनी ही हंडी फोडली.

आपल्या मुलांना खेळता खेळता छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, या उद्देशाने बनवलेल्या ‘मावळा’ या राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्डगेमच्या जिवंत प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. यासह रुद्रांग वाद्यपथक (ट्रस्ट) व आवर्तन ढोल ताशा पथक व पुणे यांचे बहारदार वादनाने खेळणी दहीहंडी उत्सवाला साज चढला.

प्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, संयोजक व श्री शिवछत्रपती मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कान्होजी जेधे आणि ऍड. ऋचा जेधे, दयानंद जेधे, मावळा बोर्डगेमचे अनिरुद्ध राजदेरकर, सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ आदी उपस्थित होते. संयोजनासाठी साईराज नाईक, सिद्धार्थ वाडेकर, मंगेश कोंढरे, साहिल भिंगे, विक्रांत गवळी, प्रथमेश माने, राणोजी जेधे, यश जैन, राजवीर जेधे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, संदीपसिंग गिल यांनी हा उपक्रम विधायक असून, बालगोपाळांच्या सहभागाने बालगोपाळांसाठी केलेली ही दहीहंडी आहे. भगवान श्रीकृष्ण जसे बालगोपाळासंगे मिसळून खेळण्याचा आनंद घेत होते, तोच प्रसंग आज इथे पाहायला मिळाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
 

कान्होजी जेधे म्हणाले, “समाजभूषण स्वर्गीय बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे व देशभक्त केशवराव उर्फ तात्यासाहेब जेधे यांचा वारसा पुढे चालवत असताना दहीहंडी उत्सव मुलांसोबत साजरा करावा, या विचाराने ही वेगळी बालगोपाळ खेळणी दहीहंडी आयोजिली होती. यामध्ये १०० ते १५० प्रकारच्या दीड हजारांहून अधिक खेळणीचा समावेश होता. ही खेळणी अनाथ मुलांच्या संस्थांमध्ये, तसेच दुर्गम भागातील मुलांना वाटण्यात आली. शिवाजी महाराज मुलांना समजावेत, यासाठी ‘मावळा’ खेळ खूपच उपयुक्त आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *