‘बापल्योक’मधून बाप-लेकाचे नाते उलगडण्याचा प्रयत्न

‘बापल्योक’मधून बाप-लेकाचे नाते उलगडण्याचा प्रयत्न

विठ्ठल काळे यांची भावना; विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये माजी विद्यार्थी मंडळातर्फे मुलाखत

पुणे : “आयुष्यातील सगळे दुःख उरात घेऊन लेकरांना मायेची ऊब देणारा बाप बाहेरून कठोर वाटत असला, तरी आतून तो प्रेमळ असतो. बाप-लेकाचे नाते अलौकिक असते. या नात्याला उलगडण्याचा, कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या बापा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न ‘बापल्योक’मधून केला आहे. प्रत्येकाला आपली वाटावी, अशी ही कलाकृती आहे,” अशी भावना ‘बापल्योक’ चित्रपटाचे नायक, कथालेखक व विद्यार्थी साहाय्यक समितीचे माजी विद्यार्थी विठ्ठल काळे यांनी व्यक्त केली.
 
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्र व माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने विठ्ठल काळे यांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. मंडळाचे सचिव सुनील चोरे यांनी काळे यांच्या वैयक्तीक जीवनाचा व चित्रपटातील बाप लेकाचा प्रवास उलगडवत मुलाखत एका उंचीवर नेली. प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, विद्यार्थी विकास केंद्राच्या प्रमुख सुप्रिया केळवकर यांच्यासह कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काळे यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
विठ्ठल काळे म्हणाले, “ग्रामीण भागातून आल्यामुळे बाप-लेकाचे विलक्षण नाते मला अनुभवता आले. सुख-दुःखात, माझ्या अडचणींच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा बाप, त्याचे जगणे कथेत मांडत गेलो. कलाकृती रंजक व्हावी, यासाठी काही काल्पनिक प्रसंग मांडले. सहज व हलकीफुलकी कथा प्रेक्षकांना आपलेसे करत आहे. माझ्या या यशात माझी मेहनत, चिकाटी महत्वाची आहेच; पण त्याहून अधिक मला समितीमध्ये वास्तव्यास असताना मिळालेला आधार अधिक महत्वाचा आहे. माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून मेहनत करत गेलो. बारा वर्षे आणि ३६ चित्रपट केल्यानंतर प्रमुख भूमिका मिळाली. हा संघर्ष मोठा होता. या संघर्षात समिती परिवाराचा मोठा वाटा आहे.”
 
तुषार रंजनकर म्हणाले, “समितीचा विद्यार्थी सिनेसृष्टीत नाव कमावतो आहे, याचा मनस्वी आनंद वाटतो. नात्यांतील वीण सहजपणे कलाकृतीतून ताकदीने मांडली आहे. हा चित्रपट पाहिल्यावर आपल्या बापाविषयी प्रत्येकाच्या मनात कणभर का होईना, आदर वाढेल, हे निश्चित आहे.”
 
सुप्रिया केळवकर म्हणाल्या, “समितीमधील विद्यार्थी विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असतो. काळे यांची वाटचाल मुलांसाठी प्रेरणादायी अशी आहे. आईविषयी अनेकजण लिहितात, व्यक्त होतात. पण बाप काहीसा दुर्लक्षित असतो. बापाचे प्रेम कसे असते, हे या कलाकृतीत चपखलपणे दाखवले आहे.”
 
सुनील चोरे यांनी चित्रपटातील अनेक प्रसंग, घडणारे विनोद, समितीतील आठवणी, चित्रपटात काम करताना आलेले अनुभव याविषयी विचारत काळे यांच्याशी मनमोकळा संवाद केला. अंगारकी मांडे हिने सूत्रसंचालन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *