पुणे : भोंदू अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट करत अनेक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. खरात यांना कोण-कोणाकडून आणि किती वेळा फोन कॉल्स झाले, याची सविस्तर माहिती त्यांनी उघड केली.
दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांना सर्वाधिक संपर्क करणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर यांचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोढे असून त्यांनी तब्बल १८९ कॉल्स केल्याचा दावा दमानिया यांनी केला. चौथ्या क्रमांकावर खरात यांची पत्नी कल्पना असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, दीपक केसरकर यांच्याशी जवळीक असलेले दीपक लोढे, बाळासाहेब बोराडे (१५६ कॉल्स), सचिन सुंबाळे (१७७ कॉल्स), नंदकिशोर काटोर (१०६ कॉल्स) यांच्यासह राहुल देशमुख, अविनाश पोटे आणि महेंद्र शेळके पाटील यांचा भूमिकाही तपासावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दमानिया म्हणाल्या, “या प्रकरणात तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, पोलीस निरीक्षक (PI) अशा अधिकाऱ्यांकडूनही शेकडो कॉल्स झालेले पाहून मी हैराण झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात संपर्क का झाला, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.”
तसेच, महिला आयोगाकडून केवळ ९ तासांत सुनावणी पूर्ण केल्याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “इतकी काय घाई होती हे प्रकरण संपवण्याची? एसआयटीने तात्काळ संबंधितांना चौकशीसाठी बोलावायला हवे होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मात्र, दमानिया यांनी या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित सर्व राजकारणी व अधिकाऱ्यांना नोटिसा देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
