प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’तर्फे ‘भारताचा अध्यात्मिक वारसा आणि विकास’ विषयावर राष्ट्रीय परिषद
पुणे: “भारत हा कृषिप्रधान देश असून, त्याग, समर्पण व बंधुत्वाची भावना ही भारताची संस्कृती आहे. अर्थ, काम, धर्म व मोक्ष यांचे संतुलन साधले तर समाजाचे स्वास्थ्य चांगले राहते. त्यासाठी अध्यात्मकेंद्रित विकास गरजेचा आहे. स्वस्थ व सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी भगवान महावीरांनी सांगितलेल्या व्रतांचे पालन करायला हवे. ही शिकवण देत सूर्यदत्त शिक्षण संस्था जीवनाचा समतोल साधण्याबरोबरच विद्यार्थ्यांना सर्वांगीण व मूल्याधिष्ठित शिक्षण देत आहे, ही आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद बाब आहे,” असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक, अध्यात्मिक गुरु आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांनी केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने बावधन कॅम्पसमध्ये ‘भारताचा अध्यात्मिक वारसा आणि विकास’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत डॉ. लोकेश मुनीजी बोलत होते. प्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, मुंबईतील उद्योजक किशोर खाबिया, दीक्षार्थी चेतन भाई, ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, संचालक प्रशांत पितालिया यांच्यासह सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आचार्य डॉ. लोकेश मुनीजी म्हणाले, “विज्ञान आणि अध्यात्म एकमेकाना पूरक आहेत. श्रद्धापूर्वक केलेले काम पूर्णत्वास जाते. आजच्या काळात दीक्षा घेण्याचा मार्ग अवघड आहे. परंतु आपल्या मनातील निश्चय, श्रद्धा यामुळे आध्यात्मिक मार्गाचा अवलंब सहज शक्य होतो. चेतन भाई या मार्गावर चालू पाहत आहेत. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना दीक्षा मिळाली आहे. त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रासाठी चांगले योगदान द्यावे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “यशप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचे १०० टक्के योगदान द्यायला हवे. कोणत्याही गोष्टीत सातत्य, परिश्रम, चिकाटी आणि श्रद्धा महत्वाची असते. ‘सूर्यदत्त’ने स्थापनेपासून सातत्याने मूल्यांचे, सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्यावर भर दिला आहे. आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांच्यासारख्या महात्म्यांचा ‘सूर्यदत्त’ला आशीर्वाद मिळतो, ही समाधानाची गोष्ट आहे.’
किशोर खाबिया म्हणाले, “कालसुसंगत असा हा कार्यक्रम आहे. भारताच्या समृद्ध वारशाचा, संस्कृती व परंपरेचा आपल्याला अभिमान असायला हवा. इतिहास समजून घेतल्याशिवाय आपल्या शाश्वत विकास सध्या करता येणार नाही. त्यामुळे भारतीय संस्कृती, परंपरा अबाधित ठेवत आधुनिक विकासाकडे वाटचाल करायला हवी.”
दीक्षार्थी चेतन भाई यांनी सांगितले की, भगवान महावीर यांच्या भूमीत माझे वास्तव्य आहे. ही भूमी संस्कारमय असून, त्याकडूनच मी दीक्षा घेत आहे. योग व अध्यात्म माझ्या हृदयात आहे. आचार्य डॉ. लोकेश मुनीजी माझे प्रेरणास्थान असून, भगवान महावीरांचे विचार व आचार्यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.”
स्नेहल नवलखा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले.