Post Views: 17
जबाबदार नागरिकांच्या योगदानातून भारत महासत्ता बनेल
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा
पुणे: “दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली होती. त्यापैकी भारत एकमेव देश आहे, जिथे आजही लोकशाही शाश्वतपणे उभी आहे. इतर देशांत स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांतच लोकशाही कोसळली. भारतीय लोकशाही मात्र, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही टिकून आहे. याचे श्रेय भारतीय संविधान, संविधानाचे शिल्पकार, भारताचे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, भारतीय माध्यमे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनतेला जाते,” असे प्रतिपादन घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी केले.
७५व्या भारतीय संविधान दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रा. उल्हास बापट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बावधन कॅम्पसमध्ये आयोजित हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय संविधान आणि लोकशाहीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जिल्हा उपभोक्ता आयोगाचे माजी न्यायाधीश उमेश जावलीकर, ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य केतकी बापट, सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर अँड डिजिटल सायन्सचे प्राचार्य अरिफ शेख, डॉ. आनंद गायकवाड यांसह सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सर्व शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
प्रा. उल्हास बापट यांनी ‘संविधानाची ७५ वर्ष’ या विषयावर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी विविध प्रकारच्या लोकशाहींचा उल्लेख करत भारतीय लोकशाहीची रचना आणि संविधान शिल्पकारांच्या योगदानावर चर्चा केली. जावलीकर यांनी कायद्याच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वावर प्रकाश टाकला. ‘लेमॅन’पासून ‘लॉमन’कडे जाण्याची तुमची यात्रा सुरू झाली असून, लोकशाहीच्या विविध पैलूंना समजून घेण्यास त्याची मदत होणार असल्याचे त्यांनी कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितले.
उपस्थित सर्व अतिथी, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी भारतीय संविधानात दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. प्रसंगी सूर्यदत्त विधी महाविद्यालयातील संविधान क्लबचे उद्घाटन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. विजयदीप मुंजकर यांनी स्वागत केले. प्रा. केतकी बापट यांनी प्रास्ताविक केले. समन्वयन सृष्टी धायगुडे या विद्यार्थिनीने केले. प्रा. निलेश सरवडे यांनी आभार मानले.
“सूर्यदत्त संस्था समाजातील राजकीय आणि सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जागरूकता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्यातून सूर्यदत्तचे विद्यार्थी जबाबदार नागरिक बनतील. भारताला महासत्ता बनविण्यासाठी योगदान देतील. मूलभूत कर्तव्ये आणि जबाबदारी याबाबत जागरूकता असण्याची गरज आहे. संविधानाचा अभ्यास करून आपली मूलभूत कर्तव्ये व जबाबदारी समजून घ्यायला हवी.”
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
|