‘सूर्यदत्त’च्या सुषमा चोरडिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

‘सूर्यदत्त’च्या सुषमा चोरडिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

मंगलप्रभात लोढा व लेफ्टनंट जनरल (नि.) डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलेन्स-२०२३’ प्रदान

पुणे : शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सूर्यदत्त वूमन आंत्रप्रेन्युअरशीप अँड लीडरशीप अकॅडमीच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया यांना सर्टिफिकेट ऑफ एक्सलेन्स-२०२३ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते चोरडिया यांना गौरविण्यात आले. मुंबई येथील ऑर्किड हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी नवभारत ग्रुपचे संचालक वैभव माहेश्वरी, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव उपस्थित होते. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सुषमा चोरडिया यांचे अभिनंदन केले.
 
मंगलप्रभात लोढा म्हणाले, “भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौशल्य विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत. केंद्र आणि राज्य सरकार कौशल्य विकास आणि मूल्यावर आधारित शिक्षणावर विशेष कार्यक्रम राबवित आहे. कोणताही रोजगारावर आधारित अभ्यासक्रम सुरु करायचा असेल तो प्रस्ताव राज्य सरकार तात्काळ मंजूर करेल. सूर्यदत्त संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे, कौशल्याचे शिक्षण देण्यात चोरडिया दाम्पत्याचे योगदान आहे. त्याचबरोबर महिला आणि समाजसेवा क्षेत्रात सुषमा चोरडिया उल्लेखनीय काम करत आहेत. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधत नव्या पिढीला आवश्यक उपक्रम राबविण्यात त्यांचा सहभाग आहे.”
 

परोपकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या चोरडिया समाजाच्या भल्यासाठी आणि वंचितांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट, फूड बँक, नॉलेज बँक, क्लोदिंग बँक, प्रॉडक्ट बँक अंतर्गत विविध स्वयंसेवी कौशल्य आधारित प्रकल्प, जागरूकता कार्यक्रम आणि समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गाला मोफत शिक्षण देण्यात येते. समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासह गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणे आणि कोणताही भेदभाव न करता त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या, तसेच २००० पेक्षा अधिक नोकरदारांना उच्चशिक्षणासाठी ‘लर्न व्हाईल अर्न’ अंतर्गत शिष्यवृत्ती, महिला, रेल्वे कुली, रिक्षा ड्रायवर, अशा आर्थिक मागास वर्गातील मुलामुलींना कौशल्य विकासाचे, इंग्रजी भाषा व संगणकाचे प्रशिक्षण देत असल्याबद्दल त्यांना ओळखले जाते. सूर्यदत्त ग्रुपने सुरू केलेल्या विविध महिला सक्षमीकरण कार्यक्रमांमध्ये चोरडिया यांचा मोलाचा वाटा आहे. गावातील महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप, तसेच शिलाई प्रशिक्षण, मुलांना मोफत कपडे आणि सकस आहाराचे वाटप, महिला तसेच इतरांकरिता आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्यविषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांचा समावेश आहे.

सुषमा चोरडिया म्हणाल्या, “सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि सर्वांगीण शिक्षण देत आहे. संस्था यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून, या वर्षात मिळालेला सन्मान विशेष आनंददायी आहे. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया संस्थापक व अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण, कमवा आणि शिका तसेच शिष्यवृत्तीच्या योजनेतून आर्थिक सहकार्य, स्टार्टअपना संधी देत आहे. जीवनगौरव सन्मानामुळे शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरण क्षेत्रात प्रभावी कार्य करण्याच्या आपल्या ध्येयास पाठबळ मिळाले आहे.”