पुणे : “मुले ही देवाघरची फुले असतात. या फुलांचा सुगंध दरवळल्यासारखे चैतन्य आता संपूर्ण शाळेत पसरले आहे. मुलांच्या प्रफुल्लित चेहऱ्यांनी सर्वत्र उत्साह अनुभवायला मिळत असून, कोविडच्या दोन वर्षांच्या भयानक काळानंतर आता हा आनंदाचा क्षण परत आपण अनुभवत आहोत,” असे मत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक संचालक प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. यावेळी पंजाबी ढोलच्या गजरात मुलांचे आगमन झाले. विद्यार्थ्यांच्या मनोरंजन व ज्ञान या दोघांचा समतोल साधत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्याध्यापिका शीला ओक, मोनिका हजारे, गौरव शर्मा, सरिता हल्लूर आदी उपस्थित होते.
चिमुकल्यांना रंगांशी खेळायला आवडते, हे ध्यानात घेत खास रंगांच्या ताटल्या भरून ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मुलाने आपले हाताचे पंजे त्यात बुडवून त्याचा छाप काढला. त्यापासून सुंदर असे रंगीबेरंगी झाड रंगविण्यात आले. शिवाय मुलांनी आपापल्या आवडीच्या रंगांनी विविध चित्र रंगवले. या सर्व चित्रांचे यावेळी प्रदर्शन मांडण्यात आले होते.
याबरोबरच खेळाद्वारे मुलांमधील जागरूकता वाढावी म्हणून खास मुंबईहून त्यातील तज्ज्ञ धारा मेहता यांना बोलावण्यात आले होते. त्यांनी ‘थिंकिंग विथ बॉडी’ या खेळाद्वारे मुलांना तत्परता, शरीरावर नियंत्रण, श्रवणशक्ती वाढविणे, लक्षपूर्वक ऐकून कृती करणे अशा विविध गोष्टी खेळाद्वारे शिकविल्या. या सर्व उपक्रमांसाठी मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व उपक्रम यशस्वी केल्याबद्दल प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी अभिनंदन केले.