पुणे : “शिक्षण संस्थांमधून ज्ञानाबरोबरच संस्कारही मिळावेत. ‘सूर्यदत्त’ सारख्या संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आहेत. समाजातील आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. समाजहितासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी आपण प्रत्येकाने योगदान द्यायला हवे,” असे प्रतिपादन कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. जीवनमूल्यांच्या अनुकरणातूनच भारताचे उज्ज्वल भविष्य घडेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
‘सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव (प्रशासकीय सेवा), कर्नल (नि.) सुरेश पाटील (पर्यावरण संवर्धन), ‘जीतो’चे संस्थापक ललित गांधी (उद्योग, सामाजिक), सुरेश कोते (सहकार व सामाजिक), डॉ. राजेश गादिया (वैद्यकीय सामाजिक सेवा), बंधुताचार्य प्रकाश रोकडे (मानवता व बंधुतेचा प्रसार), मुकेश मोदी (उद्योग, सीएसआर) यांना प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ ‘बीव्हीजी’चे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड (कॉर्पोरेट एक्सलन्स), उद्योजक चंद्रकांत साळुंके (एसएमई प्रोत्साहन), रोटेरियन डॉ. सिमरन जेठवानी (महिला सक्षमीकरण, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन (सामाजिक कार्य), सौरभ बोरा (आर्थिक व आध्यात्मिक सेवा), सॉलिसिस लेक्सचे व्यवस्थापकीय भागीदार ऍड. अमित मेहता (कायदा व न्यायव्यवस्था) आणि ग्लोबल डिजिटल मीडिया तज्ज्ञ भाव्या श्रीवास्तव यांना प्रदान करण्यात आला.
थावरचंद गेहलोत म्हणाले, “शिक्षणाला उद्योजकता, सामाजिकतेची जोड द्यावी. डिजिटल लर्निंग, इनोव्हेशन, स्टार्टअप, मेक इन इंडिया यासारखे उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. नवीन शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर, नीतीमूल्यांवर भर दिला असून, मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी दिली जात आहे. आधुनिक, मूल्याधिष्ठित आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्याचे कार्य सूर्यदत्त संस्था करीत आहे. याच पद्धतीचे शिक्षण सर्व संस्थांनी दिले, तर भारत विश्वगुरू बनण्यास वेळ लागणार नाही.”