सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी मंदिरे उघडा: पुणे मनसेची मागणी; तांबडी जोगेश्वरी समोर आंदोलन

सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी मंदिरे उघडा: पुणे मनसेची मागणी; तांबडी जोगेश्वरी समोर आंदोलन

पुणे : कोरोनामुळे सामान्य लोकांमध्ये निराशाजनक वातारण आहे. या निराशेतून लोकांना बाहेर पडण्यासाठी राज्यातील मंदिरे तातडीने उघडण्याची गरज आहे, अशी मागणी करीत पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी नगरसेवक बाबू वागस्कर, वसंत मोरे, रुपाली पाटील, जयराज लांडगे यांच्यासह सर्व उपशहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयराज लांडगे म्हणाले, आम्ही केवळ राजकारणासाठी-राजकारण करीत नाही. मंदिरे उघडण्याची मागणी राजकीय नाही. मागील अनेक दिवसांपासून मंदिरे बंद आहेत. आपल्या श्रद्धेच्या ठिकाणी लोकांना जाता येत नाही, त्यामुळे निराशेचे वातावरण आहे. ही निराशा झटकून, लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी मंदिरे उघडण्याची गरज आहे.
सरकारचे अपयश झाकण्यासाठी लॉकडाउन नको
राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी लॉकडाउन लावण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे. कोरोनाकाळात बंदी असतानाही राजकीय मेळावे, मोर्चे, जनसंवाद यात्रा काढल्या जात आहेत. राजकीय कार्यक्रमांनी कोरोनाचा संसर्ग होत नाही आणि मंदिरे उघडली की कोरोनाचा संसर्ग होतो, हा उपरटा न्याय आहे, अशी टीकाही मनसेच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *