भाजप प्रवेशाचे वृत्त निराधार व खोडसाळपणाचे

भाजप प्रवेशाचे वृत्त निराधार व खोडसाळपणाचे

 
माजी आमदार संजय जगताप यांचा खुलासा; कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत
 
पुणे: ‘संजय जगताप यांच्याकडून भाजप प्रवेशाची चाचपणी’ अशा स्वरूपाचे वृत्त गुरुवारी काही माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. हे वृत्त निराधार, बिनबुडाचे, खोडसाळपणाचे आणि जाणूनबुजून माझी बदनामी करणारे आहे. आपण काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असून, भाजपमध्ये जाण्याचा काहीच संबंध येत नाही, असा खुलासा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार संजय जगताप यांनी केला. अशा स्वरूपाचे बदनामीकारक वृत्त देणाऱ्या माध्यमांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
 

माजी आमदार संजय जगताप म्हणाले, “गुरुवारी काही माध्यमांकडून संजय जगताप भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याबाबत चाचपणी करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले गेले. अशा चुकीच्या बातमीमुळे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजमध्येही गैरसमज पसरला आहे. यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. ही बातमी प्रसिद्ध करताना माझा कोणताही खुलासा घेतला गेला नाही. यापूर्वी काही माध्यमांकडून जाणीवपूर्वक माझी बदनामी होईल, अशा स्वरूपाचे वृत्त प्रसिद्ध केले गेले आहे. त्यात्या वेळी संबंधित माध्यमांना ताकीद देऊनही असे प्रकार वारंवार घडताहेत, ही खेदाची बाब आहे.”

“माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध करताना संबंधित व्यक्तीकडून त्याचा खुलासा घेणे अपेक्षित आहे. मात्र, सनसनाटी निर्माण करण्यासाठी असे खोटे व खोडसाळपणाचे वृत्त प्रसिद्ध केले जाते, ही बाब गंभीर आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. त्यामुळे अशा बातम्यांनी व्यथित झालो आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजातील संभ्रमाचे वातावरण सुरू व्हावे, यासाठी माझी बाजू स्पष्ट करीत आहे. माध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन करायला हवे,” असे संजय जगताप यांनी नमूद केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *