पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या मालिकेअंतर्गत पुण्यातील ‘आदर्श विद्यालय’ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पावसाळ्यातील सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्या शिक्षणप्रवासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि समाजहिताची जाणीव जोपासत विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करणे आणि समाजात सेवाभावाची प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमावेळी आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलिमा लांजेवार, शाळेतील सर्व शिक्षिका, तसेच राम घायतिडक (पाटील), पुणे जिल्हा सरचिटणीस प्रदीप घाडगे, नरसिंग भंडारी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत ‘सूर्यदत्त’चे आभार मानले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ‘६५ वर्षे – ६५ समाजोपयोगी उपक्रम’ या संकल्पनेतून ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनात अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये सकारात्मक योगदान देण्याचा सूर्यदत्तचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, म्हणाले, “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, समाजाप्रती आपली जबाबदारी अधिक दृढ करण्याची संधी असते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविणे, त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात छोटासा का होईना हातभार लावणे, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण, संस्कार आणि सेवाभाव या त्रिसूत्रीच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, हीच सूर्यदत्तची भूमिका आहे.”
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “मुलींचे शिक्षण, सुरक्षितता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप हा उपक्रम मुलींना त्यांच्या शिक्षणप्रवासात समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हा विश्वास देण्याचा प्रयत्न आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन सातत्याने कार्यरत राहील.”
