सतेज पाटील यांचे मत; ‘व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन’तर्फे नदी स्वच्छता अभियानात पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

सतेज पाटील यांचे मत; ‘व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन’तर्फे नदी स्वच्छता अभियानात पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे, ता. ९: शहरातून वाहणारी मुळा-मुठा नदी पुण्याची जीवनदायिनी आहे. मात्र, आज ती मरणासन्न अवस्थेत आहे. येणाऱ्या पिढीला स्वच्छ पाणी, शुद्ध हवा व प्रदूषणमुक्त शहर द्यायचे असेल, तर नदी, पर्यावरण संवर्धनात तरुणांचा पुढाकार महत्वाचा आहे. पुणेकरांनी लोकसभागातून आपल्या मुळा-मुठेला प्रवाहित ठेवण्यासाठी पुढे यायला हवे,” असे मत माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले.
 
शहरातील नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी ‘व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन’तर्फे आयोजित नदी स्वच्छता अभियानावेळी सतेज पाटील बोलत होते. भिडे पुलानजीक मुठा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
 
या स्वच्छता अभियानात माजी मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी महापौर प्रशांत जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीनिवास बी. व्ही., नगरसेविका अल्पना वर्पे, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुणाल राऊत, संयोजक व ‘व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन’चे प्रमुख ऋत्विक धनवट आदी उपस्थित होते.
 
यशोमती ठाकूर म्हणाल्या, “केंद्र सरकार ‘नमामि गंगे’सारख्या योजनेवर करोडो रुपये खर्च करते. मात्र, नद्यांची अवस्था बिकट आहे. आपल्या नद्या स्वच्छ ठेवायच्या असतील, तर लोकसहभाग आणि विशेषतः तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. भावी पिढीला निरोगी आणि चांगले जीवन जगता यावे, यासाठी नद्यांचे पावित्र्य जपायला हवे. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ चर्चा नको, तर प्रत्यक्ष कृती व्हावी.”
 
ग्रीन पाथ रिव्होल्यूशन, टुनवाल मोटर्स, ग्रँट मेडिकल फाउंडेशन, रुबी हॉल क्लिनिक, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, गुडनोट मीडिया, पुणे हवामान योद्धा आदी संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला. आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय शिवाजीनगर येथील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘नदीला शब्दांची नाही, कृतीची गरज आहे’, ‘नदी पुन्हा हसावी, यासाठी कारणीभूत बना’ या संदेशांद्वारे नदी संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज अधोरेखित करण्यात आली. या मोहिमेदरम्यान नदीकाठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. सहभागी नागरिकांनी प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. उपक्रमात सहभागीना प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात आले.
————————–
शहराच्या शाश्वत विकासासाठी आमची संस्था कार्यरत राहणार आहे. नदी स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर, प्रदूषण नियंत्रण असे उपक्रम हाती घेण्यात आले असून, पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुठा नदीची स्वच्छता आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. तरुणांना उत्स्फूर्त सहभाग सुखावणारा आहे.
– ऋत्विक धनवट, प्रमुख, व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन