समावेशकतेवर विशेष भर देत शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना पाठबळ देते आणि अनाथालये तसेच स्वयंसेवी संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूतीची जाणीव रुजवते. पेन्सिल कारखाने, शॉपिंग मॉल्स आणि ऐतिहासिक स्थळांना दिलेल्या शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याची संधी मिळते. सामाजिक विषयांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पत्रलेखन, सादरीकरणे आणि चर्चांद्वारे विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्यास प्रोत्साहन दिले जाते. सादरीकरण कौशल्य, आत्मविश्वास आणि स्वतंत्र विचारसरणी विकसित करण्यावर भर देतानाच ‘गुड टच-बॅड टच’सारख्या वैयक्तिक सुरक्षाविषयक जीवनकौशल्यांचेही शिक्षण दिले जाते. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करून आधुनिक ज्ञानाची सांगड घालत, सूर्यदत्त नॅशनल स्कूल सक्षम, संवेदनशील आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारे विद्यार्थी घडवण्याचे कार्य सातत्याने करत आहे, असे त्यांनी नमूद केले.
सीबीएसई परीक्षेत उल्लेखनीय यशाची सूर्यदत्त नॅशनल स्कुलची परंपरा कायम
पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत बावधन येथील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. शाळेच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. यंदाच्या निकालात एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले असून, तब्बल ८७ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शाळेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेचे दर्शन घडते.
आश्लेषा सतीश पवार हिने मुलींमधून ९०.८० टक्के गुण मिळवत, तर सोहम हर्षद परुळेकरने ८९ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विषयानुसार गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आश्लेषा पवार हिने इंग्रजीत ९८ तर समाजशास्त्रात ९५, नैतिक शर्माने हिंदीमध्ये ९३, सोहम परुळेकरने मराठीत ८४ व विज्ञान विषयात ९४, अश्विन नाईकने गणितामध्ये ९४ गुण मिळवत यांनी अव्वल स्थान पटकावले.
या यशाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. विद्यार्थी, पालकांचे, तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश शक्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. निकालातील सातत्य आणि शिक्षक व विद्यार्थ्यांतील सदृढ नाते यामुळे सर्वोत्तम कामगिरी शक्य होत असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी ‘सूर्यदत्त’च्या वतीने खूप शुभेच्छा आणि त्यांना भविष्यात लागणारे मार्गदर्शन, सहकार्य सूर्यदत्त नेहमी करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
‘सूर्यदत्त’मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. त्यामुळेच दरवर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्त शाळेचे विद्यार्थी चमकतात. सूर्यदत्त नॅशनल स्कुल ही शाळा ‘नाबेट’ मान्यताप्राप्त असून, उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शाळेची समर्पण वृत्ती यामधून दिसून येत आहे. महाराष्ट्रातील ज्या १७ शाळांना ‘नाबेट’चे मानांकन आहे, त्यामध्ये सूर्यदत्त शाळेचा समावेश असल्याचा अभिमान आहे. इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या (आयआयआरएफ) २०२५ मधील क्रमवारीत सूर्यदत्त नॅशनल स्कुल महाराष्ट्रात बारावे, तर देशात ३६ वे आहे. तसेच टाइम्स स्कुल सर्वेक्षणात पश्चिम विभागात सूर्यदत्त नॅशनल स्कुलला उत्कृष्ट सीबीएसई शाळा गौरवले आहे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया पुढे म्हणाले की, सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये तसेच बुद्धिबळ स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उज्वल कामगिरी करत शाळेचा गौरव वाढवला आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. ‘फिनिक्स एआय’ आणि अबॅकससारख्या प्रगत शैक्षणिक प्लॅटफॉर्ममध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. शाळेत शिक्षणाबरोबरच इनडोअर आणि आउटडोअर खेळांमध्ये सक्रिय सहभागासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. मूल्याधिष्ठित शिक्षणावर आधारित शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण होत असून, सामाजिक प्रकल्प, विज्ञान प्रदर्शन आणि पर्यावरण जनजागृती उपक्रमांद्वारे त्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
