एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह; ई-शिवाई बसमधील चालकाच्या वर्तनामुळे प्रवासी धास्तावले

एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह; ई-शिवाई बसमधील चालकाच्या वर्तनामुळे प्रवासी धास्तावले

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवाई बसमधील चालकाच्या वर्तनामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस कोल्हापूरहून पुण्याकडे येत होती. प्रवासादरम्यान चालक बस अतिशय वेगात आणि बेदरकार पद्धतीने चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. अचानक ब्रेक लावणे, वळणांवर नियंत्रण न ठेवणे आणि सतत हॉर्न वाजवणे यामुळे प्रवासी अस्वस्थ झाले होते.

याबाबत काही प्रवाशांनी चालकाला समज देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी वाद घालत चालकाने अयोग्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा वाद वाढल्यानंतर कराडजवळ चालकाने बस थांबवली आणि फाळके नावाच्या प्रवाशाला व त्यांच्या पत्नीला मध्यरात्री बसमधून खाली उतरवण्यात आल्याचे समोर आले.

निर्जन ठिकाणी दाम्पत्याला उतरवल्याने इतर प्रवासी संतप्त झाले. त्यांनी चालकाच्या या वर्तनाचा निषेध करत बस पुढे जाऊ दिली नाही. अखेर प्रवाशांच्या दबावामुळे संबंधित दाम्पत्याला पुन्हा बसमध्ये घेण्यात आले आणि बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

दरम्यान, या प्रकरणाची दखल एसटी प्रशासनाने घेतली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.