मुंबई/पुणे : भारतातील डाय आणि मोल्ड उद्योगासाठीचे सर्वात मोठे ‘डाय अँड मोल्ड इंडिया प्रदर्शन २०२६’ येत्या २१ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत बॉंबे एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. टूल अँड गॉज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (टॅग्मा) इंडियातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले असून, टूल आणि डाय मेकिंग उद्योगातील ७०० पेक्षा अधिक कंपन्या, या क्षेत्रातील तज्ज्ञ, तंत्रज्ञान पुरवठादार आणि आंतरराष्ट्रीय नवकल्पकांना एकाच छताखाली आणणार आहे, अशी माहिती टॅग्मा इंडियाचे अध्यक्ष देवराया मंजुनाथ शेरेगर यांनी दिली.
शेरेगर म्हणाले, “या प्रदर्शनात साधननिर्मिती, साचा निर्मिती, प्लास्टिक इंजेक्शन साचा प्रक्रिया आणि अचूक उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे दर्शन घडणार आहे. संगणक नियंत्रित यांत्रिक प्रक्रिया, विद्युत डिस्चार्ज यंत्रणा, संगणक सहाय्यित रचना व उत्पादन प्रणाली, स्तरित उत्पादन तंत्रज्ञान, उष्णता प्रक्रिया उपाय आणि प्रगत त्रिमितीय मुद्रण यांसारख्या तंत्रज्ञानाचे व्यापक सादरीकरण येथे होणार आहे. यंत्रसामग्रीपासून साचा यंत्रे, साचा बेस आणि विविध घटकांपर्यंत संपूर्ण अभियांत्रिकी साखळीचा समावेश या प्रदर्शनात असेल.”
वाहन उद्योग, टिकाऊ वस्तू, विद्युत उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक उत्पादन अशा विविध क्षेत्रांतील व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. ज्ञानविनिमय, संवाद आणि व्यवसायवृद्धीसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक बाजारपेठेशी जोडणारा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदर्शनातून देश-विदेशातील कंपन्यांना सहकार्य आणि तंत्रज्ञान देवाणघेवाणीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. अचूक साधननिर्मिती आणि उत्पादन क्षेत्रातील उत्पादक, अभियंते, खरेदीदार आणि निर्णयकर्त्यांसाठी हे प्रदर्शन अत्यावश्यक ठरणार आहे, असे उपाध्यक्ष डी. षण्मुगसुंदरम यांनी सांगितले.
