पुणे : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक अशी घटना उघडकीस आली आहे, जी ऐकून अंगावर काटा येतो. एका बापाने आपल्या मृत लेकीचा मृतदेह तब्बल पाच महिने घरात ठेवला आणि तिच्यासोबतच राहत राहिला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तळी मोहल्ल्यात राहणारे उदय भानू बिस्वास आपल्या ३४ वर्षीय मुलगी प्रियांकासोबत राहत होते. काही महिन्यांपासून प्रियांका कुणालाच दिसत नव्हती. तिच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी घर गाठलं आणि जे समोर आलं, ते पाहून सगळेच सुन्न झाले.
घराचा दरवाजा उघडताच आत कचऱ्याचे ढीग आणि असह्य दुर्गंधी… मात्र बेडवर मृतदेह नव्हता, तर फक्त सांगाडा उरला होता. प्रियांकाचा मृतदेह पूर्णपणे सडून गेला होता.
चौकशीत समोर आलं की, प्रियांकाचा मृत्यू पाच महिन्यांपूर्वी झाला होता. पण वडिलांनी ही बाब कोणालाही सांगितली नाही. उलट घरातून दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून ते सतत परफ्यूम आणि अगरबत्तीचा वापर करत होते. पोलिसांना घरातून परफ्यूमच्या अनेक रिकाम्या बाटल्या सापडल्या.
या घटनेचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा प्रियांकाच्या चुलत भावाने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला उदय बिस्वास यांनी टाळाटाळ केली, नंतर “ती डेहराडूनच्या रुग्णालयात आहे” असे सांगितले. मात्र संशय बळावल्याने नातेवाईकांनी थेट घर गाठलं आणि सत्य बाहेर आलं.
प्राथमिक माहितीनुसार, प्रियांकाला कावीळ झाली होती. तिच्यावर योग्य उपचार न करता वडील जादूटोण्याचा आधार घेत होते. याचदरम्यान तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
या घटनेमागे एक दु:खद भूतकाळही समोर आला आहे. २०१३ मध्ये प्रियांकाच्या आईने आत्महत्या केली होती. त्या घटनेचा मानसिक परिणाम कुटुंबावर खोलवर झाला होता. आता लेकीचाही मृत्यू झाल्यानंतर उदय बिस्वास यांची मानसिक स्थिती ढासळली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मृत्यूचे नेमके कारण आणि इतर बाबींचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेने ‘बाप-लेकीच्या नात्याचा’ एक भयावह आणि हृदयद्रावक पैलू समोर आणला आहे.
