पुणे(प्रतिनिधी : पायल पोटभरे) : शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दुसरा विवाह करण्याच्या उद्देशातून स्वतःच्या ११ महिन्यांच्या मुलाचा खून केल्याचा आरोप एका आईवर असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र अशोक पवार (रा. भांबर्डे, ता. शिरूर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपी पूजा रविंद्र पवार हिने स्वतःच्या मुलगा यशचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील मुरुड येथे जाऊन आल्यानंतर मुलगा सतत रडत असल्याने आरोपी महिला त्रस्त होती. त्यातच दुसरा विवाह करण्याच्या विचारातून मुलगा अडथळा ठरत असल्याची विकृत भावना तिच्या मनात निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर तिने घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर मुलाचे डोके आपटून त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आरोपीने रक्त पाण्याने धुऊन काढले. त्यानंतर मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरून शेतातील विहिरीत टाकण्यात आला. बॅग पाण्यात बुडून राहावी यासाठी त्यात दगड टाकण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. या अमानवी घटनेमुळे शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
