पुणे : सामाजिक कार्यकर्ते लायन अनिल मंद्रूपकर यांना देशभरातील सहा राज्यांमध्ये ४७ वर्षे केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील ‘अटल राष्ट्र सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध क्षेत्रांतील ५० जणांना यावेळी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रकवी दिवंगत रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यास, नवी दिल्ली यांच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार स्थापित करण्यात आला आहे.
मंद्रूपकर यांनी १९७९ मध्ये गुजरातमधील मोरबी पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करून सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्यानंतर युवक बिरादरी, लायन्स इंटरनॅशनल, वनराई, डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये फाउंडेशन, एकलव्य, आशीर्वाद वृद्धाश्रम, स्नेहक्षितिज मेंटल रिहॅबलिटेशन, लेकटाऊन सोसायटी, विश्वेश्वर एम्पॉवरमेंट विविध सामाजिक संस्था तसेच स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने काम केले.
