पुणे : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे खरातचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
याच मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची आणि राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकर यांची नार्को टेस्ट करावी, तसेच त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) ची तपासणी करून खरातसोबतचे संपर्क आणि संभाषण उघड करावे, अशी मागणी अंधारे यांनी केली. काही पीडित महिलांनी चाकणकर यांच्याकडून दबाव आणि धमक्या आल्याचा आरोप केल्याचेही त्यांनी नमूद केले.
अंधारे यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, चाकणकर यांनी अघोरी विधीसाठी स्वतःच्या हाताची अनामिका कापल्याचे फोटो त्यांच्या ताब्यात आहेत. सप्टेंबर २०२४ पासून त्यांच्या हाताला बँडेज असल्याचे फोटो दाखवत, तंत्र-मंत्रात वशीकरणासाठी अशा प्रकारचे कृत्य केले जाते, असा आरोप त्यांनी केला. तसेच खरात आणि चाकणकर यांच्यात निकटचे वैयक्तिक संबंध असल्याचाही दावा त्यांनी केला.
या दोघांमधील आर्थिक व्यवहारांचे पुरावे आपल्या जवळ असून ते लवकरच सार्वजनिक करणार असल्याचा इशाराही अंधारे यांनी दिला. स्वतःला सुधारणावादी म्हणवणाऱ्या व्यक्तीने अंधश्रद्धेच्या कृत्यांत सहभागी असल्यास ते अत्यंत गंभीर असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, एका पीडितेने नाव न सांगण्याच्या अटीवर चाकणकर यांच्या उपस्थितीत अघोरी प्रकार घडत असल्याचा दावा केल्याचे अंधारे यांनी सांगितले. नाशिकपासून इंदूर, नलखेडा आणि गुवाहाटीतील कामाख्या देवी मंदिरापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता चाकणकर यांची नार्को टेस्ट, तसेच आरोपींसोबत समोरासमोर चौकशी (कन्फ्रंटल इन्क्वायरी) करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली. तसेच निष्पक्ष तपासासाठी चाकणकर यांना त्यांच्या पदावरून तातडीने दूर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
