अनधिकृत होर्डिंग्ज आणि बेवारस वाहनांवर पुणे पोलीस-महापालिकेची संयुक्त कारवाई

अनधिकृत होर्डिंग्ज आणि बेवारस वाहनांवर पुणे पोलीस-महापालिकेची संयुक्त कारवाई

पुणे : शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, पथारी व्यावसायिक तसेच रस्त्यांवर उभी असलेली बेवारस वाहने यांच्यावर पुणे पोलीस आणि पुणे महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मोठी कारवाई करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत शहरभर विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

शहरातील कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा राजकीय पक्षाचे अनधिकृत होर्डिंग्ज आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

याशिवाय शहरातील विविध भागांत अनधिकृतपणे पथारी लावणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाई केली जाणार आहे. अनेक रस्त्यांवर बेवारस वाहने उभी असल्याचेही निदर्शनास आले असून ती वाहने लवकरच हटविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि स्वच्छता राखणे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिकेने ५२७ होर्डिंग्जवर कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल आणि काही दिवसांत शहराचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.