फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे पुणे ते महाबळेश्वर रॅली; देखण्या गाड्यांनी वेधले लक्ष

फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे पुणे ते महाबळेश्वर रॅली; देखण्या गाड्यांनी वेधले लक्ष

                                                       
पुणे: पिढ्यानपिढ्या जतन केलेली, चमकदार क्रोमची किनार, गोलाईदार बॉडीची देखणी ठेवण आणि शांत पण दमदार आवाजात धावणारे इंजिन, हलके स्टिअरिंग, हॅन्डगिअर, क्लासिक ग्रील, स्लिक व रुबाबदार हेडलाईट्स अन लक्षवेधक फियाट कार्सचा क्लासिक नजराणा पाहून पुणेकर हरखले. ‘क्लासिक फियाटची वारी, महाबळेश्वरच्या वाटेवरी’ याप्रमाणेच फियाट कारचा ताफा शहरातून मार्गक्रमण करत महाबळेश्वरकडे रवाना झाला. १९५५ पासूनच्या विविध रंगांच्या २० पेक्षा अधिक क्लासिक गाड्यांनी या रॅलीत सहभाग घेतला.
 
फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे या क्लासिक फियाट कार रॅलीचे शनिवारी आयोजन केले होते. पुणे ते महाबळेश्वर या निसर्गरम्य मार्गावर जुन्या काळातील देखण्या आणि जतन केलेल्या फियाट गाड्यांचा निघालेला ताफा रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. सहभागी वाहनचालकांनी आपल्या गाड्यांची मूळ रचना आणि वैशिष्ट्ये जपून ठेवली असल्याने वाहनप्रेमींना ऑटोमोबाईल इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. मार्गात अनेक ठिकाणी नागरिकांनी या गाड्यांचे छायाचित्रण करत सहभागींना दाद दिली. 
                                                         
 
यावेळी आयोजक संजय प्रकाश ढेरे म्हणाले, “क्लासिक वाहनांचा वारसा जतन करणे आणि तरुण पिढीला या गाड्यांविषयी आकर्षण निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा रॅलींमुळे वाहनप्रेमी एकत्र येतात आणि ऐतिहासिक वाहनसंस्कृती जिवंत राहते. १९५५ पासूनच्या विविध मॉडेलच्या फियाट कार असलेले आम्ही सर्वजण हा क्लब चालवतो. काळ्या, निळ्या, लाल, पांढऱ्या, हिरव्या अशा विविधरंगी व्हिंटेज कार घेऊन आम्ही महाबळेश्वर, गोवा, मुंबई, बंगळुरू, कन्याकुमारी असे विविध ठिकाणांना भेटी देत असतो.” माझ्या वडिलांची ही गाडी असल्याने माझ्याशी त्याचा भावनिक बंध असून, ती चालवताना वडिलांचा सहवास मला मिळतो, असे भावनिक उद्गार ढेरे यांनी काढले.

शीतल सोनकांबळे यांनी सांगितले की, माझ्याकडे १९९१ मधील फियाट कार आहे. ही कार आमच्या कुटुंबासाठी केवळ वाहन नसून आठवणींचा ठेवा आहे. अनेक वर्षे जपून ठेवलेल्या या गाडीची देखभाल आम्ही स्वतः करतो आणि अशा रॅलीत सहभागी होताना तिचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. लोकांच्या उत्सुक नजरा आणि कौतुकाचे शब्द हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक असते.